उंब्रज/प्रतिनिधी
आशियाई महामार्गावर पुणे ते कोल्हापूर जाणाऱ्या महामार्गावर सिंधुदुर्गाच्या एका गृहस्थाला बोरगाव ता.सातारा पोलिसांच्या कार्यपध्दतीचा विचित्र अनुभव आला. स्विफ्ट गाडीतून जात असताना पाठीमागून येणाऱ्या गाडीने जोराची धडक दिल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्याच्या गायकवाड साहेबांनी पाठीमागून धडक देणाऱ्या एका साहेबांच्या गाडीला सोडून दिले व परजिल्ह्यातील दोघांना तासनतास रखडवून नाहक त्रास देवून पोलीस ठाण्याची वारी करायला लावली. या प्रकाराने बोरगाव पोलिसांच्या कार्यपद्धती बद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.
ही घटना पेरले(काशिळ)गावच्या हद्दीत रविवार दि.६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेबाबत लक्ष्मण मनोहर गावडे रा. कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) यांनी सांगितलेला प्रकार असा की, रविवारी लक्ष्मण गावडे आणि त्यांचा मित्र नितीन पेडणेकर राहणार आचरा,असे दोघेजण दि. ६ रोजी मुंबई ते कोल्हापूर रस्त्यावरून प्रवास करत होते.
सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस हद्दीत पेरले(काशिळ) गावानजीक त्यांच्या स्विफ्टकारला पाठीमागून येणाऱ्या कारने धडक दिली या धडकेमध्ये गावडे यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले. परंतु त्यांच्या कारला ठोकलेल्या पाठीमागील गाडीत ड्राइविंग सीट वर बसलेल्या व्यक्तीने त्यांची ओळख पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले व गावडे यांची काहीही चुक नसताना पाच हजाराची मागणी केली. यावेळी गावडे यांनी सदर व्यक्तीला तुमच्या गाडीला मी ठोकलेले नाही. तर तुम्हीच माझ्या कारला मागून ठोकले आहे. त्यामुळे माझा पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर सदर व्यक्तीने आपल्या पदाचा गैरवापर करत बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार यु.एस गायकवाड यांना बोलावले. त्यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत गावडे यांना मुद्दाम पोलीस स्टेशनला यायला सांगितले. मात्र पाठीमागून धडक दिलेल्या त्या दुसऱ्या कारला सोडून दिले.
त्यानंतर लक्ष्मण गावडे यांनी त्यांचे मित्र विशाल भोसले यांना सदरचा प्रकार सांगितला. त्यांनी त्यांच्या सातारा व रत्नागिरी येथील मित्रांनी गावडे यांना वस्तुस्थिती समजून घेत संबंधित पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती केली. तरीही गावडे यांना सुमारे २ तास बोरगाव पोलीस स्टेशनला थांबवून ठेवण्यात आले. व कोणताही तक्रार नसताना नाहक त्रास दिला. असा सामान्य माणसांवर अन्याय एखादा अधिकारी करत असेल आणि त्याला पोलीस साथ देत असतील तर आम्ही न्याय मागायचा कुठे असा प्रश्न लक्ष्मण गावडे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, घटनास्थळीही संबंधित गाडीतील व्यक्तीने २ ते ३ तास गावडे व त्यांच्या मित्राला स्पॉटवर उभे करून आपल्या ओळखीच्या लोकांना बोलावून पैसे देण्यासाठी दबाव आणला तसेच पैसे दिले नाही म्हणून पोलिसांकरवी १५ ते २० किलोमीटर परत बोरगाव पोलीस स्टेशनला नेऊन मानसिक त्रास दिल्याचे लक्ष्मण गावडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 26 नवे रूग्ण
Next Article ट्रॅक्टर व रोख रक्कम घेऊन ऊसतोड मुकादमाचा पोबारा









