आज सकाळी 11 वाजता होणार शपथविधी : उपमुख्यमंत्रिपदासाठी बी. श्रीरामलू, गोविंद कारजोळ, आर. अशोक यांना संधी शक्य

प्रतिनिधी /बेंगळूर
येडियुराप्पा यांच्या पदत्यागानंतर कर्नाटकात मुख्यमंत्रिपदी कोणाची निवड होणार या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. कर्नाटकाचे मंत्री आणि हावेरी जिल्हय़ातील शिग्गाव मतदारसंघाचे आमदार बसवराज सोमप्पा बोम्माई हे कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला संमती देण्यात आली. त्यांना साहाय्य करण्यासाठी बी. श्रीरामुलू, गोविंद कारजोळ आणि आर. अशोक हे तीन उपमुख्यमंत्रीही नियुक्त पेले जाऊ शकतात. बोम्माई हे कर्नाटक राज्याचे 30 वे मुख्यमंत्री या नात्याने बुधवारी सकाळी 11 वाजता शपथबद्ध होतील. राजभवन येथे राज्यपाल थावरचंद गेहलोत त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. आता मंत्रिपदांसाठी रस्सीखेच सुरू झाली असून कोणत्या नव्या चेहऱयांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, याकडे राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
दक्षिण भारतात प्रथमच भाजपला सत्तेवर आणण्यासाठी परिश्रम घेतलेल्या येडियुराप्पा यांना सोमवारी हायकमांडच्या सूचनेवरून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, सोमवारी रात्रीच नवी दिल्लीत प्रमुख नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली होती. मात्र, निर्णय झाला नाही. अखेर उत्तर कर्नाटकाला प्राधान्य देण्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून लिंगायत समुदायातील प्रभावी नेते बसवराज बोम्माई यांच्या गळय़ात मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आली. ते येडियुराप्पा यांचे अत्यंत निकटवर्तीय असून त्यांच्या शिफारसीवरूनच 61 वर्षीय बोम्माई यांची निवड झाल्याचे सुत्रांकडून समजते. भाजप विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री निवडीची घोषणा होताच बोम्माई यांनी येडियुराप्पा यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानून बोम्माई यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी रात्री 8.40 वाजता राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी भाजपच्या सर्व आमदारांनी त्यांची स्वाक्षरी असणारे समर्थनपत्र राज्यपालांना सुपूर्द केले.
विधिमंडळाची बैठक
मुख्यमंत्री निवडण्यासाठी सायंकाळीच निरीक्षक म्हणून केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि किशन रेड्डी दाखल झाले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली बेंगळूरमधील हॉटेल ‘कॅपिटल’ मध्ये रात्री 7.20 वाजता भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक झाली. अस्थायी मुख्यमंत्री येडियुराप्पांसमवेतच धर्मेंद्र प्रधान आणि किसन रेड्डी बैठकीसाठी उपस्थित राहिले. राज्य भाजपच्या सहप्रभारी अरुणा, प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्यासह पक्षातील 80 हून अधिक आमदार उपस्थित होते.
28 जानेवारी 1960 मध्ये जन्मलेले बसवराज बोम्माई फेब्रुवारी 2008 मध्ये संयुक्त जनता दलातून भाजपात दाखल झाले. दिवंगत माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्माई यांचे ते पुत्र आहेत. ते सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. तर दोन वेळा विधानपरिषदेचे सदस्यपदही त्यांनी भूषविले आहे. 2008 मध्ये त्यांनी पाटबंधारे मंत्री म्हणून उल्लेखनीय कामे केली होती. तर 2018 मध्ये गृहमंत्री आणि सहकार खाते म्हणून जबाबदारी पेलली. 2021 मध्ये मंत्रीमंडळ पुनर्रचनेनंतर त्यांच्याकडे गृहखात्याबरोबरच कायदा आणि संसदीय खात्याची जबाबदारी होती. शिवाय उडुपी जिल्हा पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
दिवसभरात तिघांची नावे होती चर्चेत
मंगळवारी सकाळी तिघांची जणांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होती. तर दुपारी आमदार अरविंद बेल्लद आणि मुरुगेश निराणी यांच्यात चुरस असल्याचे बोलले जात होते. तर विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीच्या एक तास अगोदर अरविंद बेल्लद आणि बसवराज बोम्माई यांच्यात रस्सीखेच असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. कारण बसवराज बोम्माई यांनी सायंकाळी 5 वाजता ‘कावेरी’ या निवासस्थानी येडियुराप्पांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ होते.
अरुणसिंग-येडियुराप्पा भेटीमुळे कुतूहल
भाजप राज्य प्रभारी अरुणसिंग देखील पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून बेंगळुरात दुपारी दाखल झाले. त्यांनी मल्लेश्वरम येथील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता येडियुराप्पा यांची भेट घेत मुख्यमंत्री निवडीविषयी त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी कटील, येडियुराप्पांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र, गोविंद कारजोळ, विरण्णा चरंतीमठ हे देखील उपस्थित होते.
भिन्न विचारसरणीच्या पक्षांमधून पिता-पुत्र मुख्यमंत्री होण्याची पहिलीच वेळ
पिता-पुत्र भिन्न विचारसरणीच्या पक्षांमधून मुख्यमंत्री होण्याची ही कर्नाटकच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एच. डी. देवेगौडा आणि एच. डी. कुमारस्वामी असे पिता-पुत्र एकाच जनता पक्ष परिवारातून राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. नवनियुक्त मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे पिता जनता पक्षातून निवडून येऊन मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी 13 ऑगस्ट 1988 ते 21 एप्रिल 1989 या कालावधीत मुख्यमंत्रिपद भूषविले होते. आता बसवराज बोम्माई बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
सवदी, अश्वथ नारायण यांना वगळणार?
नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीबरोबरच तीन किंवा चार उपमुख्यमंत्र्यांचीही निवड करण्यात येऊ शकते. वक्कलिग समाजातील, दलित समाजातील गोविंद कारजोळ आणि वाल्मिकी समाजातील बी. श्रीरामुलू यांची उपमुख्यमंत्रीपदासाठी निवड होवू शकते. येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद भूषविलेले डॉ. अश्वथ नारायण आणि लक्ष्मण सवदी यांना पद गमवावे लागण्याची शक्यता आहे. चार उपमुख्यमंत्र्यांची निवड होणार असल्याची चर्चाही आहे. अरविंद लिंबावळी देखील या पदाच्या शर्यतीत आहेत. बुधवारी उपमुख्यमंत्र्यांची अंतिम निवड होण्याची शक्यता आहे. या पदासाठी जोरदार रस्सीखेच असून अनेक जण वरिष्ठ नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
जनतेच्या विकासासाठी काम करेन

केंद्रातील नेते आणि येडियुराप्पा यांनी आपल्यावर विश्वास दाखवून मुख्यमंत्रिपद दिले आहे. आमदारांनी सर्वानुमते आपल्या नावाला संमती दर्शविली आहे. त्याबद्दल सर्वांचा ऋणी आहे. राज्यातील जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करेन.
बसवराज बोम्माई, नवनियुक्त मुख्यमंत्री
प्रशासन सांभाळण्यास बोम्माई समर्थ!

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱया बसवराज बोम्माई यांचे मनपूर्वक अभिनंदन. पक्षातील सर्व नेत्यांच्या पाठिंब्याने आणि लाखो कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने प्रशासन यशस्वीपणे सांभाळण्यास बोम्माई समर्थ आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
– बी. एस. येडियुराप्पा, प्रभारी मुख्यमंत्री
परिचय…
- जन्म : 28 जानेवारी 1960, हुबळी
- आई-वडील : गंगम्मा-सोमप्पा
- पत्नी : चन्नम्मा बोम्माई, मुले : भरत, अदिती
- शिक्षण : मेकॅनिकल इंजिनिअरिंग
- उद्योग : 1983 ते 1985 पुणे टेक्नो कंपनीत प्रशिक्षण
- 1993 : हुबळीत युवा जनता दलाच्या रॅलीचे नेतृत्त्व
- 1995 : कर्नाटक जनता दलाचे मुख्य सचिव
- 1996 : मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांचे राजकीय सचिव
- 1997 : विधानपरिषदेवर निवड
- 2003 : विधानपरिषदेवर निवड
- 2008 : भाजपप्रवेश, विधानसभेचे सदस्य, पाटबंधारे मंत्री
- 2013 : विधानसभेवर दुसऱयांदा निवड
- 2018 : तिसऱयांदा विधानसभेवर निवड
- 2019 : गृहमंत्री, सहकार मंत्री
- 2021 : गृहमंत्री, कायदा-संसदीय कामकाज मंत्री
- 27 जुलै 2021 : मुख्यमंत्रिपदी निवड
बोम्माईंची भाजप कार्यालयाला भेट
नवनिर्वाचित मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर बेंगळूरच्या मल्लेश्वरम येथील भाजप कार्यालयाला भेट दिली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतमातेच्या फोटोला आणि जगन्नाथ जोशी यांच्या पुतळय़ाला अभिवादन केले.









