वार्ताहर/ कोरेगाव, एकंबे
कोरेगाव आणि खटाव तालुक्याला जोडणाऱया बोधेवाडी (पिराचा) घाटामध्ये सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी मुंबईतील सायन-कोळीवाडा परिसरात राहणाऱया सुमित सुरेश मोरे (वय 32) याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह आणि त्याची चार चाकी गाडी पेटवून देण्यात आली. अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. मोरे याच्या डोक्यावर सत्तुरासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणादेखील आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सुमित मोरे हा मूळचा महिमानगड (ता. माण) येथील रहिवासी असून, त्यांचे सर्व कुटुंबीय मुंबईत स्थायिक आहेत. सायन-कोळीवाडा येथे त्याचे प्रोटीन सप्लीमेंटचे दुकान असून, तो स्वत: व त्याचा भाऊ हा व्यवसाय बघतात. त्यांचा आणखी एक भाऊ दिल्लीत वास्तव्यास असतो. सुमित हा मुंबईहून तो दहिवडीकडे येऊन -जाऊन असतो. महिमानगड येथील वडिलार्जित जमिनीची विक्री करण्याचा निर्णय मोरे कुटुंबियांनी घेतला होता. त्यामुळे तो गेले काही दिवस स्वत:ची मारुती सेलेरिओ कार क्र. एम. एच. 01-बी-बी-7105 घेऊन गावी आला होता. उर्किडे गावचे पोलीस पाटील असलेले मामा जितेंद्र श्रीरंग कांबळे यांची भेट त्याने 16 जानेवारीला घेतली होती.
सोमवारी दिवसभर तो वडिलार्जित जमिनीची कागदपत्रे जमा करण्यात मग्नग्न होता. दहिवडीत त्याने ठाण मांडले होते. सायंकाळी काम उरकल्यानंतर मुंबईला निघण्याच्या तयारीत तो होता. त्याने रात्री भावाला फोन करुन जेवण करुन मुंबईला निघतो, असे सांगितले देखील होते. रात्री 2 च्या सुमारास त्याने भावाला फोन करुन कोणी तरी माझा पाठलाग करत आहे, जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन मी तक्रार देतो, असे तो म्हणाला होता. मात्र झोपेचा अंमल असल्याने भावाने फोन ठेवला, त्याने विषय फार गांभीर्याने घेतला नाही. तो झोपी गेला.
वाठार स्टेशन-दहिवडी रस्त्यावरील बोधेवाडी (पिराचा) घाटामध्ये सकाळी रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत कार उभी असल्याचे व जवळचा एका व्यक्तीचा अर्धवट अवस्थेत मृतदेह पडला असल्याची माहिती या मार्गावरुन प्रवास करणाऱया विशाल चव्हाण याने नागेवाडीचे पोलीस पाटील संतोष चव्हाण यांना दिली. त्यांनी तातडीने वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात माहिती दिली. सपोनि स्वप्निल घोंगडे यांनी आपल्या कर्मचाऱयांसह घटनास्थळी धाव घेतली. फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे, वडूजचे बी. बी. महामुनी, सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पुसेगावचे सपोनि विश्वजित घोडके यांनी आपल्या कर्मचाऱयांसह घटनास्थळी भेट दिली. सातारा येथून आलेल्या श्वान पथकाने विशेष माग काढला नाही.
हत्या करणाऱयांनी नंबरप्लेट काढून गाडीत ठेवली
सुमित मोरे याच्या डोक्यात सत्तुरासारख्या धारदार शस्त्राने वार केला गेला असून, त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. चार चाकीत बसून, त्याच्यावर हल्ला करण्यात आला. तो मृत झाल्यानंतर गाडीतून बाहेर काढून पेट्रोलच्या सहाय्याने पेटवून दिला. अर्धवट जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह रस्त्याकडेच्या नाल्यात टाकून देण्यात आला होता. विशेष म्हणजे हत्या करणाऱयांनी चार चाकी गाडीची नंबरप्लेट काढून गाडीत ठेवली होती. घटनास्थळी पेट्रोलचा कॅन व बाटली देखील पोलिसांना आढळली आहे.
काही दिवसांपूर्वी साताऱयात कार पार्क केली होती
सुमित मोरे हा मुंबईहून दहिवडीकडे येऊन-जाऊन असल्याने तो मारुती सेलेरिओ कारचा वापर करत होता. काही दिवसांपूर्वी गावी आल्यानंतर त्याने साताऱयात कार पार्क केली होती. त्यामुळे या हत्त्येमागे महिमानगड येथील वडिलार्जित जमीन विक्री प्रकरण, सातारा कार पार्क प्रकरणचा काही संबंध आहे का याची पडताळणी पोलीस दल करत आहे.
सरकारी पंचांमुळे तीन तास मृतदेह जागेवरच पडून
सुमित मोरे याच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी शासकीय पंचांची आवश्यकता होती. त्यानुसार सपोनि स्वप्निल घोंगडे यांनी स्थानिक ग्रामसेवकांशी फोनवरुन संपर्क साधला होता. त्यांनी आम्ही थोडय़ा वेळेत पोहोचतो, असे सांगितले होते, मात्र तीन तास उलटले तरी ते घटनास्थळी पोहोचले नाहीत. पोलीस ठाण्याची गाडी पाठवू का, असे घोंगडे यांनी विचारले, मात्र आम्ही आमच्या गाडीने येतो, असे त्यांनी सांगितले. दोघे ग्रामसेवक येत नसल्याचे पाहून घोंगडे यांनी गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी मला या विषयातले काहीच माहीत नाही, असे सांगितले. एकंदरीत ग्रामसेवकांच्या दिरंगाईमुळे तब्बल तीन तास मृतदेह तसाच पडून होता. त्यांच्या विलंबामुळे तीन तासांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आला.









