प्रतिनिधी/ सोलापूर
प्रभाग क्रमांक चारमध्ये विविध विकासकामांबाबत अधिकाऱयांच्या बनावट सह्या करून जवळपास दीड कोटी रूपयांची बिले उचलली आहेत. यातील दोषी नगरसेवक, सदस्य व अधिकाऱयांवर येत्या 24 तासात गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त डॉ. दीपक तावरे यांनी नगरअभियंता संदीप कारंजे यांना दिले आहेत.
प्रभाग क्रमांक चारमध्ये अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत कामे झाली आहेत. तिच कामे भांडवली वार्डवाईज, दुरूस्तीच्या बजेटमधून केली आहेत, तर विविध ठिकाणी रस्ते करणे, ड्रेनेजलाईन टाकणे आदी कामे केली आहेत. परंतु ती कामे कोणत्या ठिकाणी केली आहेत ? याचा उल्लेख नाही. अशा प्रकारे अनेक कामांची बिले अधिकाऱयांची बनावट सही करून घेतली आहेत. याबाबत 18 जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएमच्या नगरसेवकांनी यासंबंधी आवाज उठवला. याची दखल आयुक्त डॉ. तावरे यांनी घेतली असून, मंगळवारी सायंकाळी संबंधित अधिकाऱयास 24 तासाच्या आत दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे, तर प्रभाग क्रमांक एकमध्येही बोगस कामे झाली आहेत. येथील कामांची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे.
तीन वर्षांतील कामांची होणार तपासणी
-प्रभाग चारमध्ये विविध विकासकामे झाली असली तरी एकच काम वारंवार केल्याचे दाखवले आहे. या कामांची बिलेदेखील अधिकाऱयांच्या खोटय़ा सह्या करून उचलली आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक चारमधील गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी नगरअभियंता संदीप कारंजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीकडून तीन वर्षांतील कामाची तपासणी करून आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे.








