बेंगळूर : पोटनिवडणुकीत राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजप आमदार मुनिरत्न यांना बोगस मतदार ओळखपत्र प्रकरणी उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. 2018 मधील विधानसभा निवडणुकीत आढळून आलेल्या बोगस मतदार ओळखपत्रासंबंधी पोलीस चौकशीचा पडताळणी अहवाल सादर करण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयाची नेमणूक करण्याची सूचना न्यायालयाने दिली आहे.
बोगस मतदार ओळखपत्र प्रकरणाचा तपास पोलिसांनी योग्य पद्धतीने केलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची विनंती करून एन. आनंदकुमार आणि जी. संतोषकुमार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. बुधवारी या याचिकेवर मुख्य न्यायाधीश अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील विभागीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्या. अभय ओक यांनी प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला आहे का?, याची पडताळणी करावी. त्याकरिता एक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयाची नेमणूक राज्य पोलीस महासंचालकांनी करावी. पडताळणी करून 15 डिसेंबरपूर्वी बंद लखोटय़ातून न्यायालयात अहवाल सादर करावा, अशी सूचना दिली. तसेच सुनावणी 18 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.









