वृत्तसंस्था/ अबूजा
पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणणाऱया बोको हराम संघटनेचा म्होरक्या अबू बक्र शेकाउ हा विरोधी गट द इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिकन प्रोविन्ससोबतच्या संघर्षात मारला गेला आहे. इस्लामिक स्टेटने एका ध्वनिफितीद्वारे अबू बक्र मारला गेल्याची पुष्टी दिली आहे.
इस्लामिक स्टेटसोबतच्या संघर्षात शेकाउ पूर्णपणे घेरला गेला होता आणि त्याने आत्मघाती स्फोटाद्वारे स्वतःचे जीवन संपविले आहे. इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिकन प्रोविन्सचे नेते अबू मुसाब अल बरनावी यांनी स्वतःच्या ध्वनिफितरुपी संदेशात बोको हरामचा कमांडार मारला गेल्याची माहिती दिली आहे. नाजेरियातील गुप्तचर अहवाल आणि बोको हरामच्या कारवायांवर लक्ष ठेवून असणाऱया जाणकारांनी अबू बक्र मारला गेल्याची पुष्टी दिली आहे.
लेक चाड भागातील संघर्षादरम्यान अबू बक्र मारला गेला आहे. इस्लामिक स्टेट आता चेक चाडमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवत आहे. हा भाग कधीकाळी बोको हरामचा बालेकिल्ला मानला जात होता. इस्लामिक स्टेट दीर्घकाळापासून अबू बक्र हटवू पाहत होता.
अबू बक्रच्या मृत्यूनंतर आता दोन्ही गटांमधील हिंसक प्रतिस्पर्धा संपुष्टात येणार असल्याचे मानले जात आहे. बोको हरामचे दहशतवादी आता इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. ईशान्य नायजेरियात इस्लामिक स्टेट आता वरचढ होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. इस्लामिक स्टेट आता सरकार तसेच सैन्यावरील हल्ले वाढवू शकते.









