वार्ताहर / केळघर :
मेढा-केळघर विभागातील 54 गावांसाठी पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी तालुक्याचा आमदार म्हणून मी सुरवातीपासून प्रयत्न करत आहे. या धरणाच्या प्रश्नाला राजकीय रंग देऊन राजकारण करण्याचा काही जण मुद्दामहुन प्रयत्न करत आहेत. माझा या प्रकल्पाला विरोध असल्याचा अपप्रचार ही केला जात असून माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास आमदार श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
आंबेघर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिवेंद्रराजे म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत. भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या जोरावर लढवून विजयश्री खेचून आणणार आहे. मी कधीच निवडणूक, राजकारण, मतदान यांना प्राधान्य न देता लोकांच्या मागणीनुसार विकासकामांना प्राधान्य दिले आहे. बोंडारवाडी धरण मार्गी लागले पाहिजे ही माझी सुरवातीपासून भूमिका आहे. यासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे. असे असताना माझा या प्रकल्पाला विरोध असल्याचे काहीजण बोलत आहेत. माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे तयार आहेत योग्य वेळ आल्यावर मी विरोधकांचा समाचार घेईन. पण लोकांसाठी महत्वाच्या या प्रकल्पात कुणीही राजकारण आणून स्वतः ची पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, असा गर्भित इशारा ही त्यांनी विरोधकांना दिला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जावली बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे, मेढय़ाचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, उद्योजक राजेंद्र धनावडे आदी उपस्थित होते.









