लोक ‘मटका’ अशी हाक मारायचे
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘जर्सी’वरून चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. हे दोन्ही कलाकार सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. प्रमोशनादरम्यान मृणालने स्वतःच्या बॉडी शेमिंगबद्दल खुलासा केला आहे.
बॉडी शेमिंगसंबंधी नेहमी उघड बोलणाऱया बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक म्हणून मृणालला ओळखले जाते. अनेकदा लोक माझ्या शरीराची चेष्टा करतात आणि मला ‘मटका’ अशी हाक मारत असल्याचे तिने म्हटले आहे.

माझ्या शरीरावरून मला अनेकदा टोमणे मारण्यात आले आहेत. परंतु मला माझ्या शरीराबद्दल वाईट वाटत नाही, उलट मी याबद्दल गर्व बाळगते. सर्वप्रथम झीरो फिगर असणे आवश्यक नाही. तंदुरुस्त असणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे माझे मत आहे. आम्हा सर्वांच्या शरीराचा आकार वेगवेगळा असल्याचे उद्गार तिने काढले आहेत.
मृणालने यावेळी अमेरिकेतील एक अनुभव देखील सांगितला आहे. अमेरिकेत असताना अनेक महिला माझ्यासारखे शरीर मिळविण्यासाठी मोठा खर्च करत असल्याचे काही जणांनी मला सांगितले होते. एका व्यक्तीने तर मला भारतीय किम कार्दशियन संबोधिले होते. कुठल्याही प्रकारचा ट्रोल मला प्रभावित करू शकत नसल्याचे मृणालने यावेळी म्हटले आहे.









