शॉर्टसर्किट होऊन धावत्या कारने घेतला पेट
प्रतिनिधी /बेळगाव
धावत्या कारने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी दुपारी बॉक्साईट रोडवर घडली. राजस्थान येथील एक व्यक्ती कामानिमित्त बेळगाव येथे आली असता कारने पेट घेतला. स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी कारला लागलेली आग आटोक्मयात आणली असली तरी कारचे जळून बरेच नुकसान झाले.
राजस्थान येथील व्यावसायिक कामानिमित्त बेळगावमध्ये आला होता. डस्टर कंपनीची रेनॉल्ट कार (आर जे 14 सीआर 7733) घेऊन बॉक्साईट रोडवरील रिलायन्स मॉलसमोरून जाताना अचानक धूर बाहेर पडू लागला. धूर पाहताच चालक कारमधून बाहेर पडला. क्षणार्धात कारने पेट घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आग विझविण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु आग काही केल्या आटोक्मयात आली नाही. अग्निशमन विभागाला याची माहिती देताच काहीवेळात अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्मयात आणली. परंतु तोवर कारचे बरेच नुकसान झाले होते. वायरींगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली असण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. ‘बर्निंग कार’चा हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढली होती.









