वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा येथील बॉक्साईट रोडच्या मागील बाजुस असलेल्या तलावाचा विकास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान निर्मिती कामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर होते.
हिंडलगा परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी तलावाचे सुशोभिकरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान निर्माण करण्यासाठी माजी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून समाज कल्याण खात्याचे मंत्री श्रीरामुलू यांच्या फंडातून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
सदर निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासह तलावाचे सुशोभिकरण करण्यात येणार असून, तालावाच्या बाजुने पेव्हर्स, रिलींग बसवून नागरिकांसाठी विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. निधी मंजूर करून घेण्यासाठी ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर व आरएसएसचे पदाधिकारी संतोष पाटील यांनी पाठपुरावा केला. त्याबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कामाचा शुभारंभ शुक्रवारी भूमिपूजनाने झाला. यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मनोळकर, उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, माजी अध्यक्ष रामचंद्र मनोळकर, सदस्या एन. एस. पाटील, निर्मलकुमार धाडवे, चंद्रकांत बांदिवडेकर, ओमकार हळदणकर, संतोष पिल्ले, सदस्या सीमा देवकर, स्नेहल कोलेकर, लक्ष्मी परमेकर, संगीता पलंगे, मिनाक्षी हित्तलमनी, आरती कडोलकर, परशराम येळ्ळूरकर, यल्लाप्पा कडोलकर, सेक्रेटरी सुखदेव कोलकार, दुर्गाप्पा कांबळे, देवाप्पा जगताप, नितिनसिंग रजपूत यांच्यासह पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.









