वार्ताहर / बैलूर
येथील पुरातन परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक मंदिरांपैकी पावणाई, मंगाई, चाळोबा, सातेरी, मार्कंडेय नदीच्या उगम स्थानावरील सिद्धनाथ व नव्याने जीर्णोद्धार केलेले मार्कंडेय आणि चव्हाट गल्लीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवास सुरुवात करण्यात आली. मजरे वाडय़ावरील चव्हाट गल्लीमध्ये आणि गुरव गल्लीतील चाळोबा मंदिरासमोर दुर्गादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावर्षी कोरोनामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत येथील पावणाई, सिद्धनाथ व विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजन, हरिपाठ, काकड आरती करण्यात आली. नवरात्रोत्सव काळात भाविकांकडून देवीची ओटी भरणे, नवस फेडणे, तुलाभार, गाऱहाणे आदी व्रतवैकल्ये सुरू होती. शनिवार दि. 24 रोजी सकाळी व दुपारी पावणाई मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने आरती करण्यात आली. विजयादशमी दिवशी भाविकांकडून तळी भरण्यात आली. त्यानंतर दुपारी पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी पालखी पावणाई मंदिराला पाच प्रदक्षिणा घालतेवेळी मंदिराच्या दगडी भिंतीवर नारळ फोडून भाविकांकडून नवस फेडण्यात आले. त्यानंतर पालखी शमी वृक्षाकडे नेऊन विधिवत पूजा करून सोने लुटण्याचा कार्यक्रम करण्यात आला.
दरवर्षी येथील नवसाला पावणारी मंदिरे म्हणून ख्याती असणाऱया पावणाई, मंगाई, सातेरी आदी मंदिरात नवरात्रोत्सव काळात भाविकांची रिघ लागलेली असते. गोवा, महाराष्ट्र कर्नाटक या तिन्ही राज्यांतील भाविक येथे नवस फेडण्यासाठी येतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिर कमिटीने मास्कची सक्ती केली होती. तसेच काही नियम आखून दिले होते. त्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.









