बद्रीनाथ देवस्थानात दिल्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा
प्रतिनिधी/ बेळगाव
बद्रीनाथ येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. ‘बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या घोषणा ऐकताच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आपल्यासोबत आहे, असे सांगत भाविकांना नमस्कार केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बेळगावमधील नागरिक बद्रीनाथासह उत्तर भारतातील विविध देवस्थानांना भेट देण्यासाठी गेले आहेत. याच दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या कुटुंबीयांसमवेत बद्रीनाथ येथे गेले होते. ठाकरे दर्शन घेऊन बाहेर पडत असताना सीमाभागातील तरुणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा दिल्याने उद्धव ठाकरे अचंबित झाले. आपण नेहमीच सीमावासीयांसोबत असून यापुढील लढ्यातही अग्रभागी राहू, असे आश्वासन त्यांनी भाविकांना दिले.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे, विश्वनाथ पाटील, गजानन पाटील, किरण बडवाण्णाचे, गजानन बाडीवाले, कल्लाप्पा पाटील, जोतिबा गडकरी, किरण सावंत, दयानंद मुतगेकर, शिवकुमार शहापूरकर, देसाई, भास्कर अनगोळकर यासह इतर भाविकांचा समावेश होता.









