निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत प्राप्तिकर विभागासह ईडी अधिकाऱयांकडून तपास
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सोमवारी प्राप्तिकर विभागाकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्मयता आहे. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने रॉबर्ट वड्रा यांना नोटीस पाठवली होती. मात्र, ते प्राप्तिकर कार्यालयात चौकशीसाठी आले नव्हते. त्यामुळे प्राप्तिकर विभागाचे अधिकारीच वड्रा यांच्या घरी दाखल झाले आहेत. प्राप्तिकर विभागासोबतच अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वड्राविरोधात तपास करत आहे. त्यामुळे सोमवारी ‘ईडी’चे अधिकारीही चौकशीवेळी उपस्थित होते.
रॉबर्ट वड्रा यांच्यावर बिकानेर आणि फरिदाबादमधील जमीन घोटाळय़ाचा आरोप आहे. मात्र, सोमवारी झालेली चौकशी केवळ मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, वड्रा यांच्यावर लंडनच्या ब्रायनस्टन स्क्वेअरमध्ये चुकीच्या पद्धतीने 19 लाख पौंड किमतीचे घर खरेदी केल्याचा आरोप आहे.
वड्रा सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. यापूर्वी या प्रकरणात वड्रा यांचा सहकारी मनोज अरोराला न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. ईडीने सांगितल्यानुसार, प्राप्तिकर विभाग फरार शस्त्र दलाल संजय भंडारीविरोधात काळय़ा पैशाचा कायदा आणि कर कायद्यांतर्गत दाखल असलेल्या खटल्यांची चौकशी करत होते. यादरम्यान, अरोराच्या भूमिकेवर प्राप्तिकर विभागाला संशय आला. यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.









