गावांमध्ये सॅनिटायझर फवारणीमुळे नागरिकांतून समाधान : स्वयंस्फूर्तीने कडक लॉकडाऊन
वार्ताहर / किणये
बेळगुंदी ग्राम पंचायतीमार्फत बेळगुंदी, सोनोली व बोकनूर या तीन गावांमध्ये सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. सोमवारी सकाळी ग्राम पंचायत अध्यक्षा हेमा हदगल यांच्या उपस्थितीत बेळगुंदी ग्राम पंचायतपासून फवारणी करण्यास सुरुवात केली.
बेळगुंदी गावातील सर्व गल्ल्या, घरांमध्ये सॅनिटायझरची फवारणी केली. त्यानंतर सोनोली व बोकनूर गावातही हा उपक्रम राबविण्यात आला. बेळगुंदी गावात शनिवार दि. 8 पासून स्वयंस्फूर्तीने कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनला नागरिकांतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या ग्रामीण भागात सर्दी, ताप, खोकला रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बेळगुंदी गावात विविध प्रकारची दुकाने आहेत. तुडये, शिनोळी भागातील नागरिक बेळगुंदी गावात विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी येत होते. गावात कोरोनाचा प्रसार वाढू नये, गावातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करून ग्रामस्थ, पंच कमिटी व ग्राम पंचायत सदस्यांनी विशेष बैठक घेऊन गावात कडक लॉकडाऊन करण्याचे ठरविले व शनिवार दि. 8 पासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. बेळगुंदी ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱया गावांमध्ये सॅनिटायझर केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









