केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात युवराज स्पोर्ट्स क्लबने हिंडाल्कोचा, तानाजी स्पोर्ट्स अकादमीने अर्जुन स्पोर्ट्स क्लब धारवाडचा, हुबळी स्पोर्ट्स क्लब संघाने तेजल शिरगुप्पी अकादमी अ संघाचा, बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने चॅलेंज स्पोर्ट्स क्लब निपाणीचा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. मौलाली मकानदार, विवेकसिंग, सुनीलकुमार, वेदांत पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए मैदान बेळगाव येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात हिंडाल्को संघाने 15.3 षटकात सर्व बाद 73 धावा केल्या. मनोज पाटीलने 29 धावा केल्या. युवराजतर्फे मौलाली मकानदार व विजय धामणेकर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युवराजने 12.3 षटकात 3 बाद 74 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. श्रीशैल जाधवने 35 धावा केल्या. हिंडाल्कोतर्फे सुनील पाटीलने 3 बाद केले. दुसऱया सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 30 षटकात 8 बाद 159 धावा केल्या. आकाश कुलकर्णीने 78, तेजस पवारने 37 धावा केल्या. चॅलेंजर निपाणीतर्फे गौस पटेल, अक्षय वागळे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना चॅलेंजर निपाणीचा डाव 29.3 षटकात 158 धावात गारद झाला. अभिजित सादुगडेने 24 तर रविंद्र मोकाशीने 26 धावा केल्या. बीएससीतर्फे वेदांत पाटीलने 4, प्रवीण कुराडे, आकाश कुलकर्णी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात अर्जुन स्पोर्ट्सने 30 षटकात सर्व बाद 118 धावा केल्या. यश पवारने 41, अनुष बी.ने 38 धावा केल्या. तानाजीतर्फे ताहीर, दिलीप माने, इर्फान इरानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना तानाजी स्पोर्ट्सने 16.3 षटकात 2 बाद 123 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. विवेक सिंगने नाबाद 71 तर अनिशने 20 धावा केल्या.
दुसऱया सामन्यात तेजल शिरगुप्पी संघाने 30 षटकात 6 बाद 207 धावा केल्या. अथर्व इनामदारने 74, सिद्धार्थ रावने 54 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्सतर्फे सुनीलकुमारने 2 तर साईप्रसाद इस्माईल, सुरज, गणेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लबने 26 षटकात 2 बाद 208 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. राहुलने नाबाद 90 तर सुनीलकुमारने नाबाद 58 धावा केल्या. शिरगुप्पीतर्फे राजाराम वैद्यने 1 गडी बाद केला.









