यावेळीही मुलींनीच मारली बाजी, जीएसएस कॉलेजचा विद्यार्थी जिल्हय़ात प्रथम
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक पदवीपूर्व विभागाने शनिवारी दुपारी 12 वाजता पीयुसी द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर केला. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा निकाल 59.88 टक्के इतका लागला. तर चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ाचा निकाल 68 टक्के लागला. बेळगाव जिल्हय़ातील एकूण 20 हजार 809 नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 हजार 461 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 8 हजार 348 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. जीएसएस कॉलेजचा विद्यार्थी प्रणित विजय कल्याणशेट्टी 594 (99 टक्के) गुण घेऊन जिल्हय़ात प्रथम आला.
2019-20 मध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा निकाल 59.70 टक्के लागला होता. त्यावेळी बेळगाव जिल्हा 26 व्या स्थानी होता तर यावषीही तेच स्थान कायम ठेवले आहे.
विज्ञान शाखेमध्ये 5 हजार 519 पैकी 3 हजार 643 (66.01 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतील 7 हजार 017 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 603 (65.6 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर कला शाखेतील 8 हजार 273 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 215 (50.95 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरी भागात 61.82 टक्के तर ग्रामीण भागात 54.56 टक्के निकाल लागला. मुलांच्या तुलनेत मुलींनी घवघवीत यश मिळविल्याचे दिसून आले. 44.07 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 66.64 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावषीही निकालात मुलांनी बाजी मारली आहे.
विज्ञान शाखेत बेळगाव शहराचा बोलबाला
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात विज्ञान शाखेचा निकाल पाहता पहिले 11 विद्यार्थी हे शहरातील असल्याचे दिसून येते. जीएसएस कॉलेजचा विद्यार्थी प्रणित विजय कल्याणशेट्टी याने 594 गुण घेऊन जिल्हय़ात प्रथम आला. याचबरोबर ऋषिकेश हिरेमठ 592, खुशी भुते 591, अनिशा देशमुख 591, दिशा यादव 591, शिवमूर्त गाडवी 590, मृणाल आनंदाचे 589, यश बोरकर 589, अवधूत नाडगौडा 588, साक्षी पट्टणशेट्टी 587, सौम्याश्री ईनामदार 587 गुण मिळविले आहेत.
लिंगराज पदवीपूर्व कॉलेजची विद्यार्थिनी रोचन किरण शिंदे हिने 591 गुण मिळवून वाणिज्य विभागात जिल्हय़ात प्रथम आली. रिया संजय कांबळे 590 गुण, भूमिका चन्नापगोळ 589 गुण, श्रीधर कामत 585 गुण, साक्षी पाटील 585 गुण, अपेक्षा नायक 584 गुण, नम्रता यरगोप्पा 584 गुण, गौरव यम्मी 584 गुण, प्रिती पाटणेकर 583 गुण, पायल चांडक 583, निधी नवाणी 583 गुण घेऊन उत्तीर्ण झाली. कला शाखेत लिंगराज कॉलेजचा विद्यार्थी महेश मदन बामणे हा 577 गुण घेऊन शहरात प्रथम आला.
एका दृष्टीक्षेपात
- परिक्षेला बसलेले विद्यार्थी-20 हजार 809
- उत्तीर्ण विद्यार्थी-12 हजार 461
- अनुतीर्ण विद्यार्थी-8 हजार 348









