वाहनधारकांना बनले धोकादायक : त्वरित मुजविण्याची मगणी
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर सर्वप्रकारच्या वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. अरगन तलाव गणपती मंदिरामागील चौकात रस्त्यावर भगदाड पडले असून, वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. भगदाड बुजविण्याचा प्रयत्न यापूर्वी देखील झाला होता. मात्र पुन्हा खड्डा निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाचा नमुना चव्हाटय़ावर आला आहे.
शहरातील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक कॅम्पमधील रस्त्याने हनुमान नगरमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव- वेंगुर्ला मार्गावरील वाहतुकीत वाढ झाली आहे. हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो. सावंतवाडी, गोवा, चंदगड अशा विविध शहरातील वाहतुकीसह स्थानिक वाहनांची वर्दळ असते. पण सदर रस्ता विनायक मंदिर शेजारी चौकात खचला असून, मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने रूतण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर चौकात सहा महिन्यापूर्वी भगदाड निर्माण झाले होते. रस्त्याच्या डांबरीकरणावेळी भगदाड बुजवून दुरूस्ती करण्यात आली होती. पण हे काम व्यवस्थित झाले नसल्याने काही महिन्यातच पुन्हा रस्ता खचला आहे. मोठा खड्डा निर्माण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. या चौकात बस, प्रवासी रिक्षा थांबत असतात. त्यामुळे नागरिकांची गर्दी असते.
तसेच व्यापारी संकुल असल्याने दुचाकी वाहनांची गर्दी देखील असते. हनुमान नगरकडून येणाऱया रस्त्यावर भगदाड निर्माण झाले असल्याने दुचाकी वाहने खड्डय़ामध्ये अडकून पडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे काही नागरिकांनी झाडाच्या फांद्या व टायर घातले आहेत.
पण सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत आवश्यक कोणत्याच उपाययोजना हाती घेतल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. सदर भगदाड बुजवून आवश्यक उपाय योजना राबवाव्यात, अशी मागणी होत
आहे.









