प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमधून कार्गो विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागणीला आता गती मिळू लागली आहे. बेळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून 43 हजार चौरस फुटांचे टर्मिनल उभारणीसाठी प्रस्ताव केंद्रीय विमान प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. अंतिम मंजुरीनंतरच या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
बेळगाव हा व्यापारीदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्हय़ात साखर उद्योग, दूध व कृषी उत्पादने, औद्योगिक सामग्री यांचे उत्पादन होते. यातील बऱयाच साहित्याची वाहतूक मुंबई, पुणे, बेंगळूर, दिल्ली, हैदराबाद येथे होते. नाशवंत उत्पादने वेळेत ग्राहकांपर्यंत न पोहोचल्यास ती खराब होण्याची शक्मयता असते. त्यामुळे बेळगावमधून कार्गो विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती.
कार्गोसेवा सुरू झाल्यास बेळगावच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. डोमॅस्टिक कार्गोसेवा सुरू करण्यासाठीची व्यवस्था बेळगाव विमानतळावर उपलब्ध आहे. यामुळे बेळगावबरोबरच हुबळी, कोल्हापूर, विजापूर भागातील मालवाहतूक करणे सहज शक्मय होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा बेळगावकर नागरिकांना आहे.
प्रस्ताव विमान प्राधिकरणाकडे : राजेशकुमार मौर्य (संचालक, बेळगाव विमानतळ)
बेळगावमधून विमानांद्वारे मालवाहतूक व्हावी, यासाठी कार्गो टर्मिनलचा प्रस्ताव आहे. एकूण 43 हजार चौरस फुटांचे हे टर्मिनल असणार आहे. यासाठी जागेची पाहणी करण्यात आली असून त्याचा प्रस्ताव विमान प्राधिकरणाकडे पाठविण्यात आल्याचे राजेशकुमार मौर्य यांनी सांगितले.