प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळावर प्रवाशांची संख्या मागील काही महिन्यांमध्ये कमालीची वाढली आहे. प्रवाशांच्या संख्येसोबत त्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे बेळगाव विमानतळाच्या ताफ्यात आणखी एक रुग्णवाहिका शनिवारी दाखल झाली. यामुळे कोणत्याही आपत्कालीन प्रसंगामध्ये ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरणार आहे.
मागील काही महिन्यात प्रवासी संख्या 30 हजारांच्या वर पोहोचली. दर दिवशी 1200 ते 1500 प्रवासी विमानतळावरून ये-जा करीत आहेत. त्यामुळे या प्रवाशांची सुरक्षा तसेच आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सध्या कोरोनामुळे आरोग्याबाबत जास्त खबरदारी घेतली जात आहे. बेळगाव विमानतळावर मोठी विमाने येऊ लागल्याने आणखी एका रुग्णवाहिकेची आवश्यकता भासत होती.
शनिवारी एक रुग्णवाहिका बेळगाव विमानतळाच्या ताफ्यात दाखल झाली. ही रुग्णवाहिका विमानतळावरील अग्निशमन विभागाकडे देण्यात आली आहे. यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास ती उपयुक्त ठरणार आहे.









