नागरिकांचा प्रश्न : क्लोजडाऊनमुळे कार्यालये पूर्णतः बंद
प्रतिनिधी/ बेळगाव
कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी घरपट्टी भरण्याची मुदत दि. 30 एप्रिल रोजी संपली आहे. क्लोजडाऊन केल्याने बेळगाव वनसह महापालिका कार्यालयात घरपट्टी भरून घेण्याची प्रक्रिया बंद ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांना घरपट्टी भरणे मुश्कील बनले आहे. महापालिकेच्या महसूल विभागाचे कर्मचारी कोरोना विषाणूबाबत उपाययोजना राबविण्यात व्यस्त आहेत. परिणामी घरपट्टी भरण्याची समस्या निर्माण झाली आहे. घरपट्टी भरायची कुठं, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
एप्रिल महिन्यात आगाऊ घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे शहरातील असंख्य मालमत्ताधारक एप्रिल महिन्यात घरपट्टी भरण्यासाठी महापालिकेकडे धाव घेतात. पण लोकसभा निवडणुकीच्या कामात मनपाचे कर्मचारी अडकल्याने कर भरण्यास अडचण झाली होती. तसेच मार्चअखेर कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने कोरोनाबाधिताची संख्या वाढत आहे. परिणामी राज्यात क्लोजडाऊन केले आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. महापालिकेचे कामकाजही थांबले आहे. मालमत्ता कर भरण्याची प्रक्रियादेखील थंडावली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱया कामात महापालिकेच्या आरोग्य विभागासह महसूल विभागाच्या कर्मचाऱयांना जुंपले आहे. त्यामुळे महसूल वसुलीचे काम थांबले आहे. पण एप्रिल महिन्यात 5 टक्के कर सवलत देण्यात येत असल्याने नागरिक स्वयंस्फूर्तीने कर भरण्यासाठी महापालिकेकडे धाव घेतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्लोजडाऊन असल्याने चलन देण्याची व घरपट्टी भरून घेण्याची प्रक्रिया बंद ठेवण्यात आली आहे. पण दि. 30 एप्रिलपर्यंत 5 टक्के कर सवलत देण्यात येते. मात्र क्लोजडाऊन असल्याने बेळगाव वन आणि महापालिका कार्यालये बंद आहेत. घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध केली नाही. त्यामुळे चलन कोण देणार आणि घरपट्टी कुठे भरायची, असा प्रश्न मालमत्ताधारकांसमोर निर्माण झाला आहे.
सवलतीची मुदत वाढवून देण्याची मागणी
डेबिट व पेडिट कार्डद्वारे ऑनलाईन किंवा पेटीएम द्वारे घरपट्टी भरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. पण ऑनलाईन घरपट्टी भरल्यास एसएमएसद्वारे घरपट्टी भरल्याची पोचपावती मिळते. ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली असली तरी नागरिकांना अडचणीची ठरली आहे. सध्या बेळगाव वन आणि महापालिका कार्यालयात घरपट्टी भरून घेण्याचे बंद केले आहे. परिणामी घरपट्टी सवलतीचा लाभ घेता आला नाही. घरपट्टीवरील 5 टक्के सवलतीचा लाभ मालमत्ताधारकांना मिळाला नाही. त्यामुळे सवलतीची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे.









