नाहक बदनामी करण्याचा काहींकडून प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव वनमध्ये केवळ 20 रुपये घेऊन गृहज्योती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरले जात आहेत. मात्र जाणूनबुजून बदनाम करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. केवळ बेळगाव वनमध्येच 20 रुपये घेतले जात आहेत. खासगी ऑनलाईन सेंटरमध्ये 150 ते 200 रुपये आकारले जात आहेत. तेव्हा जनतेने स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन बेळगाव वनच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
जुन्या तहसीलदार कार्यालयामध्ये गृहज्योतीचे अर्ज भरताना केवळ 20 रुपये घेतले जात आहेत. 20 रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेतली जात नाही. मात्र काहीजण याठिकाणी अधिक रक्कम घेत आहेत, असे सांगत आहेत. खासगी ऑनलाईन सेंटरमध्ये जनतेने यावे यासाठी काहीजण बदनामी करत आहेत. तरी कोणीही त्यावर विश्वास ठेवू नये, बेळगाव वनमध्ये येवून आपला अर्ज भरावा, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
कर्नाटक वनमध्येही गृहज्योतीचे अर्ज दाखल करू शकता. तेव्हा कर्नाटक वनमधूनही जनतेने अर्ज भरणे गरजेचे आहे. इतर ठिकाणी मात्र अनेकजण अधिक रक्कम घेत आहेत. त्यामध्ये जनतेची पिळवणूक होत आहे. तेव्हा जनतेने अशा अफवांना बळी न पडता अर्ज दाखल करण्यास पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









