प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील नागरिकांना विविध कर भरण्याची सुविधा बेळगाव वन केंद्रामध्ये करण्यात आली आहे. पण सर्व्हर डाऊन आणि इतर समस्यांमुळे कर भरता येत नाही. नागरिकांच्या सुविधेकरिता चार ठिकाणी बेळगाव-वन सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, दक्षिण भागातील नागरिकांच्या सोयीकरिता अनगोळ येथील बिग बझारच्या आवारात बेळगाव-वनची शाखा सुरू करण्यात आली आहे.
ऑनलाईन घरपट्टी, पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, काही नागरिकांना ऑनलाईन घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे बेळगाव-वन केंद्रात विविध बिल भरून घेण्यासह घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून घेण्यात येते. रिसालदार गल्ली, टीव्ही सेंटर, गोवावेस, महापालिका कार्यालय, अशोकनगर आदी ठिकाणी बेळगाव-वन केंद्रे आहेत. मात्र, दक्षिण भागातील नागरिकांना तसेच टिळकवाडी, मजगाव तसेच अनगोळ, जुने बेळगाव आणि विविध भागांतील नागरिकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी गोवावेसला यावे लागत आहे. या ठिकाणी गर्दी होत असल्याने बिग बझार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बेळगाव-वन केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी विविध बिले भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांच्या सोयीचे बनले आहे. नव्या केंद्रात घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर बिले भरून घेण्यात येणार असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









