प्रतिनिधी/ बेळगाव
पश्चिम घाटात निसर्गसौंदर्याने नटलेल्या बेळगाव वनक्षेत्रामध्ये सध्या 5 वाघांचे अस्तित्व आहे. बेळगाव वनविभाग व पर्यावरणप्रेमींनी घेतलेल्या मेहनतीमुळे वाघांचे संवर्धन व संरक्षण करणे शक्मय झाले आहे. त्यामुळे बेळगावच्या वनक्षेत्रात वाघांचे अस्तित्व जाणवू लागले आहे.
बेळगाव वनक्षेत्रातील पश्चिम घाटात असलेल्या खानापूर तालुका तसेच आसपासच्या भागात वाघांचे संवर्धन करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या. यासाठी वाघ संरक्षण क्षेत्रही तयार केले गेले. वाघांची कमी झालेली संख्या चिंताजनक असल्याने त्यांच्या संवर्धनाचा प्रश्न महत्त्वाचा होता. त्यानुसार लोंढा, खानापूर, कणकुंबी, बेळगाव, नागरगाळी या क्षेत्रांमध्ये वाघ संरक्षणासाठी उपाययोजना केल्या गेल्या.
या परिसरात घनदाट वनराई, बांबुचे आच्छादन, हिरवेगार गवत, बारमाही वाहणारे पाणी यामुळे चितळ, सांबर, हरिण यांची संख्या मुबलक आहे. वाघांचे खाद्य म्हणून ओळखले जाणारे प्राणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे येथे वाघांची संख्या वाढली आहे. यामुळे बेळगाव वाघांसाठीचे संरक्षित क्षेत्र म्हणून पुढे येण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
वाढलेल्या वाघांच्या संख्येबाबत बोलताना बेळगावचे उपवन संरक्षणाधिकारी अशोक पाटील म्हणाले, वाघ सतत अन्नाच्या शोधामध्ये दांडेली, महाराष्ट्र व गोवा या सीमावर्ती भागामध्ये भटकंती करत असतात. सध्या नवीन बछडय़ांनी जन्म घेतला असून वाघांच्या संख्येत वाढ होणार असल्याची शक्मयता त्यांनी व्यक्त केली.









