निमंत्रितांची महिला फुटबॉल स्पर्धा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या बेलमाग युनायटेड फुटबॉल अकादमी संघाने बेंगळूर संघाचा 2-0 असा पराभव करून उत्कर्ष चषकावर आपले नाव कोरले, आदिती जाधव हिला उत्कृष्ट स्टायकस किताबाने गौरविण्यात आले.
बेंगळुर येथे बेंगळूर एफसी टर्फ फुटबॉल मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून जवळपास 12 महिला संघांनी भाग घेतला होता. बेळगाव युनायटेड फुटबॉल अकादमीने बेंगळूरचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात अंजली हिंडलगेकरने एकमेव गोल करून संघाला विजयी गोल करून दिला.
दुसऱया सामन्यात बेळगाव युनायटेडने बेंगळूर अकादमीचा 4-0 असा पराभव केला. 12 व्या मिनिटाला आदिती जाधवच्या पासवर अंजली हिंडलगेकरने पहिला गोल केला. 17-21 व 28 व्या मिनिटाला आदिती जाधवने बचाव फळीला चकवत अप्रतिम असे 3 गोल करून स्पधेंतील पहिली हॅटट्रीक नोंदविली. उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव युनायटेडने विजया अकादमी बेळगाव संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात आदिती जाधवच्या पासवर अंजली हिंडलगेकरने सलग 2 गोल करून संघाला अंतिम फेरीत मजलू मारून नेण्यास सिंहाचा वाटा उचलला.
अंतिम सामन्यात बेळगाव युनायटेड अकादमीने बेंगळुर फुटबॉल क्लबचा 2-0 असा पराभव करून उत्कर्ष चषक पटकाविला. या सामन्यात आदिती जाधवच्या पासवर आयेशाने पहिला गोल केला तर दुसऱया सत्रात अंजली हिंडलगेकरच्या पासवर आदिती जाधवने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात बेंगळूर फुटबॉल क्लबने गोल करण्यासाठी अनेक चाली केल्या पण बेळगाव युनायटेडच्या बचाव फळीमुळी त्यांचे सर्व प्रयत्न अपुरे ठरले. बेळगाव युनायटेड संघाला मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट स्टायकरचा मान आदिती जाधव यांनी मिळविला. हिला आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या संघाचे प्रमुख प्रशिक्षक मतिन इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.









