प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या नागरिकांना रात्रीचा प्रवास करून सकाळी बेंगळूर येथे पोहोचण्यासाठी दिवंगत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी बेळगाव-बेंगळूर स्पेशल रेल्वे सुरू केली होती. या रेल्वेची रविवारी वर्षपूर्ती झाली. मागील वर्षभरात बेळगावकरांच्या पसंतीला उतरली असून, हजारो प्रवाशांनी या रेल्वेने प्रवास केला आहे. त्यामुळेच लॉकडाऊन उघडताच सर्वात प्रथम बेंगळूर एक्स्प्रेस सुरू करण्यात आली.
बेळगावमधून बेंगळूरला जाण्यासाठी राणी चन्नम्मा एक्स्प्रेस ही एकमेव रेल्वे वर्षभरापूर्वी उपलब्ध होती. राणी चन्नम्मा एक्स्प्रेस कोल्हापूरवरून निघत असल्यामुळे कोल्हापूर, मिरज, रायबाग, कुडची, गोकाक येथील प्रवाशांचे बुकींग असायचे. यामुळे बेळगावकरांच्या वाटय़ाला अत्यंत कमी जागांचे बुकींग शिल्लक राहत होते. यासाठी बेळगाव-बेंगळूर या मार्गावर रेल्वे सुरू करण्याची मागणी होत होती. 29 जून 2019 पासून प्रायोगिक तत्त्वावर बेंगळूर येथील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा स्थानकापासून बेळगावपर्यंत रेल्वे सुरू करण्यात आली. 1 नोव्हेंबर 2019 पासून ती कायम करण्यात आली.
ही रेल्वे रात्री 9 वा. बेळगाववरून निघून सकाळी 7.25 वा. बेंगळूरला पोहोचते तर रात्री 9 वा. बेंगळूरवरून निघालेली रेल्वे सकाळी 7.25 वा. बेळगावला पोहोचते. यामुळे दिवसभराचे काम करून बेळगावमधील प्रवाशांना रात्रीचा प्रवास करता येत आहे. बेंगळूर येथे कामानिमित्त जाणाऱयांसाठी ही रेल्वे उपयुक्त ठरली. त्यामुळे वर्षभरातच या रेल्वेने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. सध्या ही रेल्वे कोरोना रेल्वे स्पेशल म्हणून धावत आहे.
म्हैसूर रेल्वेनेही पूर्ण केले वर्ष
बेळगावमधून थेट म्हैसूर शहराला जाण्यासाठी रेल्वे विभागाने बेळगाव- अशोकपूरम ही रेल्वे सुरू केली. या रेल्वेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. व्यवसाय व उद्योगानिमित्त बेळगावमधील अनेक तरुण म्हैसूर येथे आहेत. त्यांच्यासाठी ही रेल्वे अतिशय उपयुक्त ठरत होती. परंतु लॉकडाऊनपासून म्हैसूर रेल्वे बंद आहे. यामुळे बेळगाव-म्हैसूर असा प्रवास करणाऱयांना बेंगळूर येथून रेल्वे बदलून म्हैसूर गाठावे लागत आहे. त्यामुळे म्हैसूर रेल्वे लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.









