बेळगाव/ प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात नियमांचा भंग करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. तातडीची सेवा वगळता अनाश्यक बाहेर फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येत आहेत. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी राज्य सरकारने दि. ७ जून पर्यंत लॉकडाऊन जारी केला आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडू नये असे सांगूनही अजूनही काही नागरिक विनकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत. सकाळी ६ ते १० या सवलतीच्या वेळेतही बाजारात, रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे.
शहरात सवलतीची ही वेळ संपल्यानंतरही ही गर्दी कमी होताना दिसत नाही. परिणामी पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून शहरातील सर्व प्रमुख चौकात तसेच रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून येणाऱ्या वाहनांची चौकशी करण्यात येत आहे. सबळ कारणाशिवाय बाहेर पडणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येत असून त्यांची वाहने जप्त करण्याचा बडगा पोलिसांनी उगारला आहे.