प्रतिनिधी /बेळगाव
पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचे दुरुस्ती काम सुरू असल्याने 15 दिवस विमानतळ बंद होते. यामुळे बेळगाव-पुणे ही विमानसेवाही बंद होती. आता पुणे विमानतळ सुरू होताच अलायन्स एअरने पुणे-बेळगाव-पुणे ही विमानसेवा पुन्हा सुरू केली आहे. यामुळे दिवाळी काळात प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे.
विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी पुणे येथील लोहगाव विमानतळ 16 ते 30 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आले. यामुळे
ऍडव्हान्स बुकिंग केलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. बेळगावमधून अलायन्स एअर पुणे शहराला विमानसेवा देते. या कंपनीच्याही विमानसेवेला ब्रेक लागला होता. यामुळे ही विमानसेवा पूर्ववत केव्हा होणार, याची प्रतीक्षा प्रवाशांना होती.
अखेर दि. 1 नोव्हेंबरपासून अलायन्स एअरने बेळगाव-पुणे विमानसेवा पूर्ववत केली. यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथून बेळगावला येणाऱया प्रवाशांना ही विमानसेवा सोयीची ठरत आहे. विमानसेवेच्या वेळापत्रकात काहीसा बदल केल्याचे अलायन्स एअरकडून कळविले आहे. दुपारी 12.50 वा. पुणे विमानतळावरून निघालेले विमान 2.05 वा. बेळगावला पोहोचणार आहे. दुपारी 2.35 वा. बेळगाववरून निघालेले विमान 3.45 वा. पुण्याला पोहोचेल. सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सेवा सुरू असणार आहे.









