प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव पायोनियर अर्बन को-ऑप बँकेची 114 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे विद्यमान चेअरमन प्रदीप अष्टेकर होते. ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या या सभेत 2 हजार 742 सभासदांनी भाग घेतला होता. बँकेचे सीईओ प्रदीप जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिवंगत बँकेच्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील वर्षाच्या इतिवृत्ताचे वाचन प्रदीप जोशी यांनी केले.
चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी 2019-20 चा अहवाल, नफा-तोटा, ताळेबंद पत्रकाचे वाचन करून मंजुरी घेतली. ऑडिट रिपोर्ट, ऑडिटरची नेमणूक, जादा झालेल्या खर्चास मंजुरी, आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी, लाभाची विभागनी व इतर निधीबाबत चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कायमस्वरुपी कर्मचारी नेमण्याबाबत चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
या बँकेकडे गेल्या आर्थिक वर्षात 84 कोटींच्या ठेवी आहेत. 54 कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. बँकेने 47 कोटींच्या गुंतवणुकीसह 83 लाख 55 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे, अशी माहिती चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी दिली.
खेळते भांडवल 101 कोटी 55 लाख
बँकेचे खेळते भांडवल 101 कोटी 55 लाख आहे. गेल्या वषीच्या व्यवहारातून अ वर्ग सभासदांना 15 टक्के तर ब वर्ग सभासदांना 8 टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे. अनेक ज्ये÷ सभासदांना सभासद कल्याण निधीतून आर्थिक मदत देण्यात आली आहे. बँकेच्या मुख्य शाखेसह 4 शाखा कार्यरत असून खातेदारांच्या सोयीसाठी आधुनिक बँक प्रणाली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा पाठपुरावा करीत आहोत. लवकरच आम्ही या सर्व सोयी उपलब्ध करून देवू, असा विश्वासही प्रदीप अष्टेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी बँकेचे संचालक अनंत लाड, शिवराज पाटील, रमेश शिंदे, गजानन पाटील, रवी दोड्डण्णावर, सुहास तरळ, गजानन ठोकणेकर, विद्याधर कुरणे, मारुती शिग्गीहळ्ळी यांच्यासह सुवर्णा शहापूरकर, लक्ष्मी कानुरकर या संचालिका उपस्थित होत्या. व्हा. चेअरमन रणजीत चव्हाण-पाटील यांनी आभार मानले.









