प्रतिनिधी / कोल्हापूर
बेळगाव महापालिका निवडणुकीत मराठी माणसाचा पराभव झाला नसून, कर्नाटक प्रशासनाने अधिकारांचा गैरवापर करत लोकशाहीची हत्या केल्याची गंभीर टीका सीमावासीयांच्या शिष्टमंडळाने शनिवारी पत्रकार परिषदेत केली. मराठी माणसांची महापालिकेवरील सत्ता संपविण्यासाठी आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी प्रशासाने नियोजनबद्ध सदोष निवडणूक प्रक्रिया राबविल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
प्रभाग रचना आणि आरक्षण यासंदर्भात असलेल्या तक्रारीविषयी न्यायालयात सुनावणी सुरु असतानाही निवडणूक रेटण्यात आली. कन्नड उमेदवार विजयी होईल आणि मराठी उमेदवार पराभूत होईल असे नियोजनबद्ध षडयंत्र करून प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया राबविली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला. दरम्यान, राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सदोष निवडणूक प्रक्रियेविषयी तक्रारी केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, लोकसभा पोटनिवडणूक लढविलेले उमेदवार व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी नगरसेवक मनोहर हालगेकर, महापालिका निवडणुकीतील उमेदवार गीता हालगेकर, पियुष हावळ, प्रशांत भातकांडे आदींनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीत घडलेले गंभीर प्रकार आणि सिमावासीयांच्या भावना मांडल्या.
पंधरा दिवसात निवडणूक उरकरण्यामागे गौडबंगाल ः सरिता पाटील
माजी महापौर सरिता पाटील म्हणाल्या, महापालिका सभागृहाचा कार्यकाळ 2019 मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर महापालिकेवर प्रशासकराज होते. कोरोना प्रादूर्भावामुळे टास्क फोर्ससह कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनीही बेळगांव महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची सूचना केली होती. तरीही केवळ 15 दिवसांत निवडणूक उरकण्यात आली. यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न सीमावासीयांना पडला आहे. एकूणच बेळगांव महापालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप सरिता पाटील यांनी केला.
कन्नडमध्ये मतदार याद्या, मराठी भाषकांची नावे वगळली ः पियुष हावळ
पियुष हावळ म्हणाले, निवडणुकीत केलेली प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. मतदार याद्या कन्नड भाषेत प्रसिद्ध करण्यात आल्या. मराठी भाषेत याद्या मिळण्याची मागणी केल्यास मतदारयाद्या आठ दिवसांनी मिळाला. तो पर्यंत याद्यांवर हरकती घेण्याचा कालावधी संपला. यामुळे याद्यांवर हरकतीही घेता आल्या नाहीत. मराठी भाषिकांची बहुसंख्या असलेल्या प्रभागात 200 ते 250 मराठी भाषिकांची नावे यादीमध्ये नव्हती. त्यामुळे हजारो मराठी मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याची काम कर्नाटक प्रशासनाने केले आहे. निवडणुकीत घसरलेला मतदानाचा टक्का याचा पुरावा असल्याचे हावळ यांनी सांगितले.
व्हीव्हीपॅटचा वापर नाही, निवडणूक यंत्रही संशयास्पद
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही निवडणुकीत ईव्हीएम मशिनसोबत व्हीव्हीपॅट यंत्रणा वापरण्यात आली नाही. यामुळे मतदारांना आपले मतदान कोणाला झाले हे पाहण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला. अनेक उमेदवारांना घरातील मतदानाइतके मतदानही संबंधित बुथवर न मिळाल्याचे वास्तव आहे. एका उमेदवाराला तर स्वतःचेच मतदानाचा हक्क न मिळाल्याचा अजब प्रकार घडला आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकाऱयांकडे तक्रार करुनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे निवडणुकीत वापरण्यात आलेली मशिनही संशयास्पद असल्याचा आरोप हावळ यांनी केला.
मतदार यादीत ग्रामीण भागातील नावे
बेळगांवला लागून असलेल्या ग्रामीण भागातील मतदारांच्या नावांचा समावेश बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या यादीत आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य, मयत झालेल्या व्यक्ती, एका उमेदवाराचे नाव चार प्रभागात तर एका मतदाराचे नाव वेगवेगळÎा प्रभागात तब्बल 19 वेळा प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा संशयही हावळ यांनी व्यक्त केला.
उमेदवारांना अंधारात ठेवण्याचे काम
मतदानापूर्वी उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशिनची तपासणी करण्यात येते. मात्र असा कोणाताही प्रकार या निवडणुकीत झाला नाही. मशिनबाबत कोणतीही माहिती उमेदवारांना दिली नाही. मशिनसोबत व्हीव्हीपॅट जोडणार आहे की नाही याचीही माहिती लपविण्यात आली. मतदानावेळी याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे निवडणुक प्रक्रीये संदर्भात उमेदवारांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आल्याची टीका हावळ यांनी केली.