स्टार एअर 22 एप्रिलपासून देणार सेवा
प्रतिनिधी / बेळगाव
तिरुपती बालाजीच्या भक्तांना आणखी एक विमान उपलब्ध होणार आहे. स्टार एअरने 22 एप्रिलपासून या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने बुकिंगही सुरू केले आहे. आठवडय़ातून 3 दिवस ही विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.
तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त जातात. त्यांची सोय व्हावी यासाठी बेळगावमधून थेट विमानसेवा उपलब्ध करून दिली आहे. ट्रुजेट कंपनी बेळगाव-तिरुपती ही विमानसेवा देत असताना आता यात स्टार एअरची भर पडली आहे. स्टार एअरने प्रवासासाठी 2 हजार 499 इतका प्राथमिक तिकीट दर ठेवला आहे. यामुळे आता तिरुपतीला जाण्यासाठी बेळगावमधून दोन विमाने उपलब्ध होणार आहेत.
अशी असणार विमानफेरी
मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस ही फेरी असणार आहे. मंगळवार व गुरुवारी सकाळी 9.30 वा. बेळगावमधून निघालेले विमान सकाळी 10.40 वा. तिरुपतीला पोहोचणार आहे. सकाळी 11.10 वा. तिरुपती येथून निघालेले विमान 12.20 वा. बेळगावला पोहोचणार आहे. मात्र शनिवारी दुपारी 2.20 वा. बेळगाव येथून निघालेले विमान 3.30 वा. तिरुपतीला पोहोचणार आहे. दुपारी 4 वा. तिरुपती येथून निघालेले विमान सायं. 5.10 वा. बेळगावला पोहोचणार आहे.
बेळगाव-नागपूर सेवा लांबणीवर
नागपूर शहराला मार्च 2021 पासून विमानसेवा सुरू करण्याची घोषणा स्टार एअरने केली होती. परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कंपनीने एप्रिलपासून ही विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रुग्णसंख्या वाढल्याने ही विमानसेवा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे बेळगाव-नागपूर प्रवास करणाऱयांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.









