पालकमंत्री सतीश जारकीहोळींची स्वातंत्र्यदिनी घोषणा
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडांगणावर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आकर्षक पथसंचलन झाले. ध्वजारोहणानंतर बोलताना पालकमंत्र्यांनी बेळगाव तालुक्याचे विभाजन करून नवा तालुका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच यासंबंधी अधिकृत घोषणा होणार आहे. बेळगाव शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बेळगाव जिल्ह्याच्या योगदानाविषयीची माहिती दिली. राज्य सरकारने जारी केलेल्या गॅरंटी योजनांबद्दलही माहिती देत बेळगाव शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून चोवीस तास पाणी योजना हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अमृत योजनेंतर्गत बेळगाव शहरासाठी 157 कोटी 56 लाखाच्या सांडपाणी शुद्धीकरण योजनेला तांत्रिक अनुमती मिळाली आहे. याबरोबरच महात्मा गांधी नगरविकास योजनेंतर्गत 125 कोटी अनुदानातून बेळगाव महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील 90 कामांना मंजुरी मिळाली आहे. 38 कामे पूर्ण झाली असून 58 कामे प्रगतीपथावर आहेत. स्मार्टसिटी योजनेसाठी आतापर्यंत 854 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी 804.91 कोटी खर्च करण्यात आले आहेत. 102 कामांपैकी 96 कामे पूर्ण झाली आहेत. सहा कामे प्रगतीपथावर आहेत, असेही त्यांनी सांगितले.
बेळगाव शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी 350 कोटी रुपये खर्च करून गांधीनगर ते आरएलएस कॉलेजपर्यंत उ•ाण पूल उभारण्यात येणार आहे, अशी घोषणाही पालकमंत्र्यांनी केली आहे. या उ•ाण पुलावरून मध्यवर्ती बसस्थानकालाही जोडण्यात येणार आहे. 300 कोटी रुपये खर्चातून जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालये उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. असे सांगतानाच बेळगाव तालुक्याचे विभाजन करण्याची घोषणाही सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.









