प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे बेळगावमध्ये अनेक परप्रांतीय मजूर, कामगार अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहचण्यासाठी बेळगावमधून श्रमिक स्पेशल रेल्वे सुरू करणे गरजेचे आहे. बेळगाव ते जोधपूर व्हाया पुणे, सूरत, वडोदरा, अहमदाबाद व बेळगाव ते दिल्ली व्हाया खांडवा, इटारसी, भोपाळ, ग्वालियर, झांसी, आग्रा, मथुरामार्गे रेल्वे सुरू करण्याची मागणी सिटीझन्स कौन्सिलच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे करण्यात आली आहे.
मंगळवारी सिटीझन्स कौन्सिलच्या सदस्यांनी अंगडी यांची भेट घेऊन त्यांना परप्रांतीय मजुरांच्या व्यथा सांगितल्या. बेळगावमध्ये कारखाने, उद्योग, लघु उद्योग, व्यवसाय, बांधकाम या निमित्ताने परप्रांतीय कामगार काम करीत आहेत. परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर त्यांचे हातचे काम गेले. मुकादमानेही हात वर केले. यामुळे या मजुरांसमोर येथे राहण्याचा व खाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. रेल्वेस्थानक, बसस्थानक, खासगी बसस्थानकांवर जावून आपल्या गावाला जायची व्यवस्था होईल का? याची चौकशी करताना हे मजूर दिसत आहेत.
रेल्वे विभागाने मजुरांना घरापर्यंत सोडण्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वे सुरू केली. त्यामुळे या मजुरांच्या गावी जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बेळगाव परिसरात 2 हजार 500 च्या आसपास परप्रांतीय मजूर अडकले आहेत. त्यामुळे जोधपूर व दिल्ली मार्गावर बेळगावमधून रेल्वे सुरू केल्यास या मजुरांना घरी जाता येईल, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सिटीझन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सदस्य सेवंतीलाल शहा, अरुण कुलकर्णी उपस्थित होते.









