163 जण झाले कोरोनामुक्त, बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
प्रतिनिधी / बेळगाव
सोमवारी कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. जिह्यातील केवळ 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या 24 तासांत 163 जण कोरोनामुक्त झाले असून वेगवेगळय़ा इस्पितळांतून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 24 हजार 452 वर पोहोचली आहे. यापैकी 23 हजार 392 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 732 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. रुग्ण संख्या घटल्यामुळे आरोग्य विभागावरील ताण कमी झाला आहे.
रविवारी जिह्यातील 68 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये बेळगाव व उपनगरांतील 10 व ग्रामीण भागातील 8 असे तालुक्यातील 18 जणांचा समावेश होता. सोमवारी बेळगाव तालुक्यातील एकही रुग्णाचा समावेश नाही. अद्याप 3 हजार 397 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतिक्षा आहे.
जिह्यातील मृतांचा सरकारी आकडा 328 इतका आहे. प्रत्यक्षात हा आकडा मोठा आहे. आतापर्यंत 2 लाख 12 हजार 323 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. 1 लाख 83 हजार 171 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अद्याप 27 हजार 296 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.









