दोघे दगावले : तालुक्यात पाच जण बाधित :धास्ती झाली कमी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची धास्ती कमी होत चालली आहे. मंगळवारी जिह्यामध्ये 27 जण कोरोना बाधित आढळले. मात्र दोघांचा मृत्यू देखील झाला आहे. बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर तालुक्मयात केवळ पाच जण कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे दिलासा मिळाला असून कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याने समाधान व्यक्त होत आहे.
कोरोना म्हणजे धडकी निर्माण होत होती. मात्र आता कोरोना बरोबर लढा देण्यासाठी जनता सज्ज झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरोनावर अनेकांनी मात केली असून डॉक्टरांनीही आता रुग्णांना योग्य उपचार देवून बरे करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कोरोनाची संख्या घटत चालली आहे. मंगळवारी जिह्यामध्ये 27 जणांना कोरोनाची लागण झाली तर तालुक्मयामध्ये केवळ 5 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात 2 तर शहर व उपनगरात 3 जणांचा समावेश आहे.
मंगळवारी पिरनवाडी, गजमीनाळ, शहरातील शाहूनगर, सदाशिवनगर येथील रुग्ण आढळले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व खासगी हॉस्पिटलात या सर्वांवर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्याही घटली आहे. त्यामुळे डॉक्टरांनीही समाधान व्यक्त केले आहे. प्रारंभी मनामध्ये जी भिती होती ती भिती कमी झाली असून जनताही आता या विषाणूंपासून सर्कता बाळगताना दिसत आहेत. असे असले तरी प्रत्येकाने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.









