आता सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत घट : सक्रिय रुग्ण केवळ 876 : 158 जण झाले बरे
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना महामारीचा फैलाव कमी होत चालला आहे. त्यामुळे साहजिकच सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट होत चालली आहे. शनिवारी सायंकाळी उपलब्ध माहितीवरून जिल्हय़ात केवळ 876 सक्रिय रुग्ण असून दिवसभरात 66 नवे रुग्ण दाखल झाले आहेत.
बेळगाव शहर व उपनगरातील 25 व ग्रामीण भागातील 12 असे तालुक्यातील 37 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे प्राणहानी झालेली नाही. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्हय़ातील 328 जण दगावले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार मृतांचा हा आकडा असला तरी प्रत्यक्षात ही संख्या मोठी आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 24 हजार 382 वर पोहोचली आहे. त्यापैकी 23 हजार 178 जण बरे झाले आहेत. 876 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. शनिवारी 158 जण पूर्णपणे बरे झाले असून वेगवेगळय़ा इस्पितळातून त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे.
प्रशासनाला अद्याप 1 हजार 382 अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 28 हजार 266 जण अद्याप चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 2 लाख 8 हजार 387 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 81 हजार 326 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोना महामारीचा फैलाव कमी होत चालला आहे. त्यामुळे साहजिकच प्रशासन व शासकीय यंत्रणा ढिली पडली आहे. बेळगावसह कर्नाटकात स्वॅब तपासणी अहवालाला विलंब होत असल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी तर स्वॅब घेतल्यानंतर तब्बल 15 दिवस अहवाल मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.









