तालुक्यात 37 जणांना लागण : एकाचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. मंगळवारी केवळ 90 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला असून एकाचा मृत्यू झाला आहे. बेळगाव तालुक्यातील 37 जणांना कोरोनाची लागण झाली. रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली असून आतापर्यंत 22 हजार 441 जण बरे झाले आहेत.
गेल्या सहा-सात महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. प्रारंभी रुग्णांची संख्या वाढत चालली होती. त्यानंतर रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली. आतापर्यंत जिल्हय़ात 326 जणांचा मृत्यू झाला आहे. आता मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून जनतेच्या मनामधील भीती कमी झाली आहे. मंगळवारी बेळगाव जिल्हय़ात 90 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये 26 जण कोरोनाबाधित आढळले असून ग्रामीण भागातील 11 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये भारतनगर-शहापूर, कॅम्प, जयनगर, घुमटमाळ-हिंदवाडी, महांतेशनगर, कचेरी गल्ली, आरसीनगर, सदाशिवनगर, संभाजीनगर-वडगाव, वंटमुरी कॉलनी, विष्णू गल्ली-वडगाव, संगमेश्वरनगर, भाग्यनगर-बेळगाव या परिसरात रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागातील येळ्ळूर, बेळगुंदी, किणये, मंडोळी, शिंदोळी क्रॉस, उचगाव, काकती या गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातही रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.









