प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातून बेळगाव शहरातील आणखी 5 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 41 वर पोहोचली आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेले 5 जण कॅम्प व इतर उपनगरातील आहेत.
शुक्रवारी दुपारी कर्नाटक राज्य आरोग्य विभागाने हेल्थ बुलेटिन जारी केले. यामध्ये 38 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली होती. बेळगावातील एकाही रुग्णाचा समावेश या यादीत नव्हता. त्यामुळे बेळगावकरांनी आता रुग्ण संख्या घटणार, अशी आशा बाळगली होती. तोच सायंकाळी 44 जणांना कोरोनाची लागण झाल्याची बुलेटिन जारी करण्यात आली. यामध्ये बेळगाव येथील 5 जणांचा समावेश आहे.
3 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्ण क्रमांक 127 च्या संपर्कातून 34 वषीय तरुण, 17 वषीय युवक, 46 वषीय तरुण, 37 वषीय तरुण व 38 वषीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. रुग्ण क्रमांक 127 हा कॅम्प येथील 26 वषीय तरुण असून दि. 13 ते 18 मार्च 2020 पर्यंत नवी दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या धर्मसभेत भाग घेऊन बेळगावला परतला होता.
हेल्थ बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार या तरुणाच्या संपर्कातील 5 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी 3 तरुण कॅम्प परिसरातील असून आणखी दोघे जण इतर उपनगरातील आहेत. ज्या-ज्या परिसरात रुग्णसंख्या वाढत चालली आहे, त्या परिसरात लॉकडाऊनचे नियम अधिक काटेकोरपणे पाळण्याचा आदेश दिला जात आहे.
3 एप्रिल रोजी रात्री जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी कॅम्प, हिरेबागेवाडी व बेळगुंदीला निर्बंधित प्रदेश जाहीर केले होते. कॅम्प व उपनगरातील काही संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामधील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या केवळ चौदा दिवसांत 41 वर पोहोचल्याने एकच खळबळ माजली आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महामारीचा फैलाव थोपविण्यासाठी पोलीस दलाला शुक्रवारी सकाळपासूनच संपूर्ण शहर व उपनगरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास भाग पडले होते. आता आणखी दोन ते तीन दिवस सर्व व्यवहार बंद करून वर्दळीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे, असे वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
शासकीय नियमांनुसार क्वारंटाईन
शासकीय नियमांनुसार संशयितांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. क्वारंटाईनमध्ये कसलीच खबरदारी घेतली जात नाही, अशास्त्राrय पद्धतीने क्वारंटाईन केला जात आहे. त्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचा आरोप होत होता. यासंबंधी जिल्हाधिकाऱयांनी शुक्रवारी खुलासा केला आहे. सरकारी नियमांनुसारच संशयितांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. हॉटेल व इतर ठिकाणी संशयितांना ठेवले आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यावर बिम्समध्ये उपचार करण्यात येत आहेत. आयएमएचे पदाधिकारी व काही तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करून उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे क्वारंटाईनमधूनच फैलाव वाढला आहे, असे म्हणण्यात तथ्य नाही. नागरिकांनी यासंबंधी भीती बाळगू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
528 जणांचे अहवाल निगेटिव्ह
बेळगाव शहर व जिल्हय़ातील 678 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये 41 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 528 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिली आहे. जिल्हय़ातील 1969 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 374 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. कोरोनामुळे एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे तर 40 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. प्रशासनाला आणखी 107 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा असून शनिवारी सायंकाळपर्यंत यापैकी काही अहवाल उपलब्ध होण्याची शक्मयता आहे.
हिरेबागेवाडी येथील वृद्धाचा मृत्यू कशामुळे?
हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) येथील एका 80 वषीय वृद्धाचा शुक्रवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एका हिरेबागेवाडीत 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याच गावातील एका वृद्धेचा गेल्या सोमवारी 13 एप्रिल रोजी मृत्यूही झाला आहे. त्यामुळे या 80 वषीय वृद्धाचा मृत्यू कशामुळे झाला? याचे कारण शोधण्यासाठी प्रशासनाने त्याचे स्वॅब जमविले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजणार आहे.









