बेळगाव/प्रतिनिधी
कर्नाटकात ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत राज्यभरात १,३७० जणांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला आहे. तर त्यापैकी ५१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मंगळवारी सांगितले आहे. दरम्यान बेळगाव जिल्ह्यातही ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत आहेत. बेळगाव जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे एकूण ८७ रुग्ण असून २ दिवसात १७ रुग्णांची भर पडल्याची माहिती जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बीम्स रुग्णालयात ब्लॅक फांगसच्या ४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच आणखी ३८ रुग्णांवर ६ खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती औषधे पुरवली जात आहेत. दोन दिवसात आणखी औषधांचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.