अवघ्या 2 तास 20 मिनिटांमध्ये बेळगावमधून चेन्नईला पोहोचता येणार
प्रतिनिधी / बेळगाव
मागील अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत असलेली बेळगाव-चेन्नई थेट विमानसेवा गुरुवार दि. 21 पासून सुरू करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना अवघ्या 2 तास 20 मिनिटांमध्ये बेळगावमधून चेन्नईला पोहोचता येणार आहे. आठवडय़ातून 3 दिवस ही थेट विमानसेवा उपलब्ध असणार आहे. यामुळे चेन्नईचा प्रवास प्रवाशांना सुखकर होणार आहे.
बेळगाव, कोकण व दक्षिण महाराष्ट्रातील अनेकजण चेन्नईला कामानिमित्त आहेत. चेन्नई येथे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असल्याने बेळगावमधील उद्योजकांची नेहमी ये-जा असते. त्यामुळे बेळगावमधून थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. इंडिगोने या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यास संमती दर्शविली. मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस ही विमानफेरी असणार आहे.
सकाळी 10.55 वा. बेळगावमधून निघालेले विमान 2 तास 20 मिनिटांनी चेन्नईला पोहोचणार आहे. सकाळी 8.10 वा. चेन्नई येथून निघालेले विमान 10.25 वा. बेळगाव विमानतळावर पोहोचणार आहे. या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 3 हजार रुपये असा प्राथमिक दर विमान फेरीसाठी आकारण्यात येणार आहे.
चेन्नईला जाण्यासाठी आताग़् तीन पर्याय उपलब्ध
बेळगाव ते चेन्नई असा प्रवास करणाऱया विमान प्रवाशांना आता तीन पर्याय उपलब्ध आहेत. ट्रूजेटने यापूर्वी म्हैसूर येथून कनेक्टिंग फ्लाईट देत बेळगाव-चेन्नई सेवा सुरू केली. स्पाईस जेटने बेंगळूर येथून कनेक्टींग फ्लाईट सुरू केली आहे. त्याचबरोबर इंडिगोनेही गुरुवार दि. 21 पासून थेट विमानसेवा सुरू केली आहे. यामुळे चेन्नईचा विमान प्रवास सुखकर होणार आहे.
नाशिक-बेळगाव उड्डाणसेवा सोमवारपासून
नाशिक :अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी नाशिक आणि उत्तर कर्नाटक यांना थेट जोडणारी विमानसेवा लवकरच सुरू होत आहे. बेंगळूरस्थित स्टार एअर ही भारतातील प्रादेशिक विमान कंपनी आपल्या दुसऱया वर्धापनदिनानिमित्त उडान योजनेंतर्गत 25 जानेवारीपासून नाशिकच्या ओझर येथील विमानतळावरून नाशिक ते बेळगाव थेट उड्डाण सुरू करणार आहे. नाशिक ते बेळगाव दरम्यानच्या थेट विमानसेवेमुळे प्रादेशिक एअरोस्पेस क्षेत्राला चालना मिळणार आहे. कारण बेळगाव हे भारतातील पहिले खासगी एअरोस्पेस एसईझेड आहे. भारताचे संरक्षण आणि एअरोस्पेस उत्पादनाचे पेंद्र असलेले बेळगाव हे नाशिकसह जगभरातील एअरोस्पेस क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी गरजांची पूर्तता करते. नाशिक आणि बेळगाव हे अंतर साधारणपणे 580 कि.मी. असून, नाशिकहून बेळगावला जाण्यासाठी 11 ते 12 तासांचा वेळ लागतो. मात्र आता विमानसेवेमुळे हे अंतर फक्त 1 तासामध्ये पूर्ण होणार आहे. नाशिककरांसाठी या विमान सेवेमुळे आता उत्तर कर्नाटक (बेळगाव, हुबळी, धारवाड, विजापूर), दक्षिण महाराष्ट्र (कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी) तसेच गोवा या ठिकाणी प्रवास करणे अत्यंत सोयीचे होणार आहे. या नव्या सेवेबद्दल स्टार एअरचे संचालक श्रेणिक घोडावत म्हणाले, स्टार एअर दोन प्रमुख भारतीय शहरांना जोडणार असल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी नक्कीच वाढेल आणि दोन्ही राज्यांतील व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळेल.









