इंडिगोकडून तारखेत बदल
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमधून चेन्नई शहराला थेट विमानसेवा फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात येणार होती. परंतु इंडिगोने आता यामध्ये बदल केला असून येत्या 21 जानेवारीपासून ही विमानफेरी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी बुकिंगदेखील सुरू करण्यात आले असून आठवडय़ातून 3 दिवस चेन्नई शहराला विमानसेवा मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
चेन्नई शहराला विमानसेवा सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. परंतु विमान कंपन्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. चेन्नई, मंगळूर व दिल्ली या शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रवाशांनी विशेष मोहीमही उघडली होती. त्यामुळे अखेर यातील चेन्नई शहराला विमानसेवा देण्यात इंडिगो एअरलाईन्स तयार झाली आहे.
2 फेबुवारीपासून इंडिगोच्या विमानफेरीला सुरुवात करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु आता कंपनीने नवीन तारीख जाहीर केली असून 21 जानेवारीपासून बेळगाव-चेन्नई विमानफेरी सुरू होणार आहे. यासाठी कंपनीने बुकिंगही सुरू केले आहे. मंगळवार, गुरुवार व शनिवार असे 3 दिवस ही विमानफेरी असणार आहे.
यापूर्वी ट्रुजेटने बेळगाव ते म्हैसूर व तेथून चेन्नई अशी विमानसेवा दिली होती. त्या फेरीलाही बेळगावमधून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता थेट विमानसेवेमुळे चेन्नईला ये-जा करणाऱया प्रवाशांची सोय होणार आहे. बेळगावमधून अनेक विद्यार्थी-उद्योजक चेन्नईला प्रवास करतात. त्यांना हे विमान सोयीचे ठरणार आहे.









