ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर साशंकता : दोन दिवसात निर्णय शक्य
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सारेच चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत 13 डिसेंबरपासून बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये होणाऱया अधिवेशनाचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुरुवारी विधानसभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी व विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी हे सुवर्णविधानसौधला भेट देऊन तयारीचा आढावा घेणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे बेळगाव अधिवेशन झाले नाही. यंदा अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. दि. 13 ते 24 डिसेंबरपर्यंत अधिवेशन भरविण्यात येणार आहे. मात्र या काळात कोरोनाची स्थिती काय असणार?, परिस्थिती आटोक्मयात असणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बेंगळूर येथे झालेल्या बैठकीतही बेळगाव अधिवेशनासंबंधी चर्चा झाली आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. बुधवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई धारवाड दौऱयावर होते. त्यावेळीही पत्रकारांनी बेळगाव अधिवेशनाविषयी त्यांना विचारले. त्यावेळी काय होतय बघू, असे सांगत त्यांनी थेट उत्तर दिले नाही.
ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या छायेखाली होणाऱया या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उत्तर कर्नाटकातील नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना यंदाचे अधिवेशन बेळगावात व्हावे, असे वाटते. एक-दोन दिवसांत जागतिक आरोग्य संघटनेची मार्गसूची जाहीर होणार आहे. ही मार्गसूची लक्षात घेऊन अधिवेशनाचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे समजते.
लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन भरविण्यास हरकत नाही. मार्गसूचींचे पालन करत अधिवेशन घेता येणार आहे, असे अभिप्रायही अनेक नेत्यांनी मांडले आहेत. एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यासंबंधीची अधिकृत घोषणा करणार आहेत. त्यानंतरच यंदाचे अधिवेशन होणार की नाही, यासंबंधीची अनिश्चितता दूर होणार आहे.









