शुक्रवारी 42 नवे रुग्ण, रुग्णसंख्येत होतेय वाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा फैलाव आटोक्मयात आला, या समजुतीत असलेल्या बेळगावकरांना पुन्हा एकदा रुग्णवाढीचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी बेळगाव व जिल्हय़ातील 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून वेगवेगळय़ा महाविद्यालयांतील सहा प्राध्यापकांचा यामध्ये समावेश आहे.
17 नोव्हेंबरपासून राज्य सरकारने महाविद्यालये सुरू केली होती. त्यापूर्वी प्राध्यापक व कर्मचाऱयांचे स्वॅब घेण्यात आले होते. बेळगाव शहर व उपनगरांतील 2 हजार 27 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून शुक्रवारी 250 जणांचे अहवाल आरोग्य खात्याला उपलब्ध झाले आहे. यामध्ये 6 प्राध्यापकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
प्राध्यापक व कर्मचाऱयांचे आणखी दीड हजारहून अधिक अहवाल यायचे असून शुक्रवारपासून आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांचीही तपासणी सुरू केली आहे. बेंगळूरसह कर्नाटकात 70 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आठ महिन्यांनंतर महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र, विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे सरकारसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
शुक्रवारी बेळगाव शहरात रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. शहर व उपनगरांतील 23 व ग्रामीण भागातील 7 असे तालुक्मयातील एकूण 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आरोग्य विभागाने प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची स्वॅब तपासणी सुरूच ठेवली असून मोठय़ा प्रमाणात अहवाल यायचे आहेत. पहिल्याच अहवालात 6 प्राध्यापकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 400 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 340 जणांचा मृत्यू झाला असून 24 हजार 650 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 400 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 2 हजार 41 जणांचे अहवाल यायचे आहे तर 28 हजार 911 जण चौदा दिवसांच्या होमकेयरमध्ये आहेत.
आयटीबीपीमधील सात जवानांना कोरोनाची लागण
दरम्यान, आयटीबीपीमधील सात जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. तर भडकल गल्ली, बसवाण गल्ली, भाग्यनगर, चन्नम्मानगर, बिम्स हॉस्टेल, पोलीस हेडक्वॉर्टर्स, रामतीर्थनगर, अंजनेयनगर, शाहूनगर, टिळकवाडी, वैभवनगर, विष्णू गल्ली वडगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्या घटली होती. मात्र, दिवाळीनंतर आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे.









