व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जिल्हाधिकाऱयांची माहिती
प्रतिनिधी बेळगाव
कोरोना महामारीचा वाढता फैलाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या? याविषयी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर चर्चा केली. बेळगावात लॉकडाऊनची गरज नाही, असे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
एकीकडे बळींची संख्या व रुग्णसंख्या वाढत असतानाच बेळगावातील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे बेळगावात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज वाटत नाही. मात्र, अथणी, कागवाड, निपाणी, गोकाक, मुडलगी येथे लॉकडाऊनची गरज आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले आहे.
लॉकडाऊन जारी करायचे की नाही? याचा निर्णय जिल्हाधिकाऱयांनीच घ्यावा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी जिल्हाधिकाऱयांवर सोपविली. त्यावेळी जिल्हाधिकाऱयांनी सध्या बेळगावात लॉकडाऊनची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यासंबंधी सोमवारी रात्री ‘तरुण भारत’ने जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधला असता बेळगावात लॉकडाऊनची गरज नाही. मात्र, काही तालुक्मयात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.









