हनुमाननगर-रेसकोर्स (गोल्फ मैदान) परिसरात घबराट : वनखात्याकडून शोधमोहीम सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
हनुमाननगर येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत असलेल्या रेसकोर्स (गोल्फ मैदान) परिसरात गुरुवारी सकाळी बिबटय़ासदृश प्राणी निदर्शनास आला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱयांनी तातडीने दाखल होऊन शोधमोहीम हाती घेतली. मात्र रात्री उशीरापर्यंत बिबटय़ा वनखात्याच्या निदर्शनास आला नाही.
येथील रेसकोर्स मैदानावर सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना बिबटय़ासदृश प्राण्याचे दर्शन झाले. त्यांनी तातडीने ही माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या अधिकाऱयांनी दाखल होऊन शोधमोहिम हाती घेतली. परिसरात बिबटय़ाच्या पावलांचे ठसे मिळतात का याचा शोध घेतला. इतर काही गोष्टी आढळतात का? याचा शोध सुरू होता. रेसकोर्स मैदानाच्याशेजारी वनक्षेत्र असल्याने भक्ष्याच्या शोधार्थ हा बिबटय़ा आला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र हा बिबटय़ाच आहे. की? अजून कोणता प्राणी याचा शोध घ्यावा लागेल. वनखात्याच्या विशेष पथकाने दिवसभर रेसकोर्स व आजुबाजूचा परिसर पिंजून काढला. मात्र बिबटय़ाच्या पाऊल खुणा किंवा इतर कोणतीच बाब निदर्शनास आली नाही. परिसरात बिबटय़ाच्या शोधासाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शुक्रवारी पुन्हा बिबटय़ासाठी शोधमोहिम सुरू होणार आहे. बिबटय़ा निदर्शनास आल्यास त्याला तातडीने जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
रेसकार्स परिसरात बिबटय़ासदृश प्राणी निदर्शनास आल्याने परिसरातील नागरिकांनी सकाळी व रात्रीच्यावेळी बाहेर फिरू नये व सतर्क रहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.









