हुबळीत दिव्यांगांना आहार किटचे वितरण
वार्ताहर /हुबळी
यंदा बेळगावात पावसाळी अधिवेशन भरविण्याबाबत अद्याप शासनस्तरावर चर्चा झालेली नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून अधिवेशन कोठे भरवावे, याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले. शहर गटशिक्षणाधिकाऱयांचे कार्यालय व फोर्थवेव्ह फाऊंडेशनतर्फे हुबळीच्या देशपांडे नगरमधील रोटरी शाळेतील कार्यक्रमात दिव्यांगांना आहार किटचे वितरण करून ते बोलत होते.
शेट्टर पुढे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारीच्या उपाययोजना हाती घेऊन अधिवेशन चालवावे लागणार आहे. राज्य अनलॉक झाले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती केली पाहिजे. कोरोनाच्या तिसऱया लाटेपासून बचाव होण्यासाठी प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हय़ात सुरळीत कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी व राज्य आरोग्य मंत्र्यांशी आपण चर्चा केली आहे. अपंग मुलांच्या संरक्षणामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. अपंग व्यक्तींच्या पालकांनीही लस घ्यावी, असेही मंत्री शेट्टर म्हणाले. फोर्थवेव्ह फाऊंडेशनकडून जिल्हय़ातील 200 अपंग मुलांना आहार किटचे वाटप केले जात आहे. हुबळीतील 75 मुलांना सोमवारी आहार किटचे वितरण करण्यात आले आहे, असे फाऊंडेशनचे बसवराज मॅगेरी यांनी सांगितले.









