पोलीस दलासमोर संघटित गुन्हेगारांचे आव्हान : नागरिकांत भीतीचे वातावरण
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये एकेकाळी गँगवारचे प्रकार चालायचे. एका गुन्हेगारी टोळीतील गुन्हेगार दुसऱया टोळीवर हल्ले करायचे. या हल्ला-प्रतिहल्ल्यातून अनेकांना जीव गमवावा लागायचा. अलीकडे बंद झालेला हा प्रकार पुन्हा सुरू झाला असून दादागिरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
सशस्त्र गुन्हेगारांच्या टोळीने पोलीस दलासमोर जणू आव्हान उभे केले आहे. आठ दिवसांत चाकूहल्ल्याचे दोन प्रकार घडले आहेत. यामागे संघटित गुन्हेगार कार्यरत असून पोलीस दलाला मात्र या गुन्हेगारी कारवाया करणाऱया टोळीचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
1 ऑगस्ट रोजी रात्री महात्मा फुले रोडवरील एका लॉजच्या व्यवस्थापकावर चाकूहल्ला झाला. याप्रकरणी विनायक उर्फ गिड्डू बोंगाळे याच्याविरुद्ध दुसऱया दिवशी शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला. तत्पूर्वी संतसेना रोड परिसरात एका गुजराती व्यापाऱयावर पैशासाठी हल्ला झाला आहे. हे प्रकरण पोलीस स्थानकापर्यंत पोहोचले नाही.
केवळ खोली दिली नाही म्हणून लॉजच्या व्यवस्थापकावर हल्ला करण्यात आला. शास्त्राrनगर परिसरात 10 ते 12 जणांची एक सशस्त्र टोळी कार्यरत आहे. रात्रीच्यावेळी पैशासाठी चाकू, जांबिया व तलवारीचा धाक दाखवत या टोळीतील गुन्हेगार नागरिकांना धमकावत आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
पोलीस अधिकारी सध्या तरी ‘निवांत’
बेळगाव शहरात उदयास आलेल्या नव्या गुन्हेगारी टोळय़ांच्या कारवायांवर लक्ष ठेवून अशा गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याची जबाबदारी असणारे पोलीस अधिकारी सध्या तरी ‘निवांत’ आहेत. सध्याच्या घटना लक्षात घेता संघटित गुन्हेगारीने बेळगावात पुन्हा डोकेवर काढल्याचे दिसून येत असून ही गुन्हेगारी वेळीच मोडून काढली नाही तर केवळ नागरिकांनाच नाही तर पोलीस दलालाही डोईजड ठरणार, हे स्पष्ट आहे.
गांजा, पन्नीची विक्री
या टोळीतील गुन्हेगार केवळ धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार करत नाहीत तर अमलीपदार्थांची विक्रीही करतात, अशी माहिती मिळाली आहे. उघडपणे गांजा व पन्नीची विक्री करण्यात येत असून गांजाच्या नशेत गुन्हेगारी कारवाया करण्यात त्यांचा हातखंडा आहे.









