बेळगाव/प्रतिनिधी
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे आमलात आणल्याने देशातील शेतकरी गेल्या २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीमधे आंदोलन करत आहेत. पण शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज देशभर काळा दिन पाळण्यात येत आहे. त्यासाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोजकेच रयत संघटना पदाधिकारी बसून निषेध दिवस साजरा करणार आहेत.
केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने आज देशभरात काळा दिन पाळण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत बेळगावातही संघटनांकडून या कायद्यांविरोधात काळा दिन पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावत आंदोलन केले.
दरम्यान, कोरोना संकटकाळात संयुक्त किसान मोर्चाने नव्या कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात काळा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर अनेकांनी आपल्या घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान गाझियाबाद सीमेवरील शेतकर्यांनी शेती कायद्याविरोधात आंदोलन सुरूच ठेवून ‘काळा दिवस’ साजरा केला.