बेळगावात कोरोना लसीकरणाला उत्साहात प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनावरील शनिवारी बेळगावसह जिह्यातील 13 इस्पितळात शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. बेळगाव येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (बिम्स्) मध्ये डीग्रुप कर्मचाऱयाला तर वंटमुरी येथील आरोग्य केंद्रात अंगणवाडी कार्यकर्त्या महिलेला प्रथम लस देण्यात आली. सरकारच्या मार्गसुचीनुसार एकूण 13 ठिकाणी लसीकरणाला प्रारंभ झाला आहे.
बुधवारी पहाटे विशेष वाहनांतून पुण्याहून लस बेळगावात दाखल झाली. व्हॅक्सीनडेपोमध्ये बॅन्ड वादनाने लसीचे स्वागत करण्यात आले होते. बेळगाव येथून 8 जिह्यांना लस पाठविण्यात आली. शनिवारी संपूर्ण जिह्यात लसीकरणाला उत्साहात प्रारंभ झाला, अशी माहिती डॉ. आय. पी. गडाद यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अथणी येथील सरकारी इस्पितळात टाळय़ांच्या कडकडाटात लसीकरणाला चालना दिली. तर बिम्स्मध्ये रमेश कुंभार या ग्रुप-डी कर्मचाऱयाला प्रथम लस देण्यात आली. यावेळी बिम्स्चे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप, प्रशासकीय अधिकारी सय्यद आफ्रीनबानु बळ्ळारी यांच्यासह वैद्यकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते.
तर वंटमुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत राणी या अंगणवाडी कार्यकर्त्या महिलेला पहिली लस देण्यात आली. यावेळी तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ, डॉ. धनवंत, डॉ. शिवानंद मास्तीहोळी आदी उपस्थित होते. बिम्स्, केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात व वंटमुरी येथील आरोग्य केंद्रासह जिह्यातील 13 ठिकाणी लसीकरणाला प्रारंभ झाला आहे.
यासंबंधी बिम्स्चे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांच्याशी संपर्क साधला असता बिम्स्मध्ये रोज 100 डॉक्टर, परिचारीका व कर्मचाऱयांना लस देण्यात येणार आहे. संबंधितांना आधिच माहिती दिली जाते. ज्यांच्या मोबाईलवर लसीसाठी संदेश पाठविला जातो त्यांनी बिम्स्ला येवून लस घ्यायची आहे, असे त्यांनी सांगितले.









