नायजेरियातून आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / बेळगाव
आफ्रिकन देशातून बेळगावला आलेल्या एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे आरोग्य खात्याला खडबडून जाग आली आहे. त्या इसमाला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्हय़ातील 5 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तीन दिवसांपूर्वी नायजेरिया येथून एक व्यक्ती हैदाबादमार्गे बेळगावला आली आहे. तो आझमनगरचा राहणारा असून गेल्या काही वर्षांपासून नायजेरिया येथे रहात होता. सांबरा विमानतळावर तपासणीसाठी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. बुधवारी सकाळी स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तातडीने आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी या इसमाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
सध्या सर्वत्र ओमिक्रॉनची भीती सुरू असतानाच आफ्रिकन देशातून बेळगावला आलेल्या इसमालाही ओमिक्रॉनची लागण झाली आहे. गुरुवारी कर्नाटकात ओमिक्रॉनचे 5 रुग्ण आढळले असून बेळगाव येथील रहिवाशाचा समावेश आहे.
आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी गुरुवारी रात्री ओमिक्रॉन रुग्णाविषयी पत्रकारांना माहिती दिली आहे. 4 पुरुष व 1 महिला अशा पाच जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
आझमनगर येथील 52 वषीय इसम ज्यांच्या थेट संपर्कात आला आहे, त्या अकरा जणांसह गुरुवारी एकूण 20 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. हे सर्व स्वॅब तपासणीसाठी लॅबला पाठविण्यात आले असून शुक्रवारी अहवाल येणार आहे. यामध्ये पॉझिटिव्ह येणारे सॅम्पल जिनोमिक सिक्वेन्सिंग तपासणीला पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी दिली.
संपूर्ण देशात कर्नाटकात सर्वात आधी ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले. सध्या बेळगाव येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनासाठी आरटी-पीसीआर तपासणीचा निगेटिव्ह अहवाल आणि दोन लसींची सक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी अधिवेशनाचे पहिले पाच दिवस पूर्ण होतात. आणखी पाच दिवस म्हणजे 24 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. सुवर्ण विधानसौधमध्ये प्रवेशासाठी नियम आणखी कडक करण्यात येणार आहेत.
दरम्यान, गुरुवारी जिल्हय़ातील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका बेळगाव तालुक्मयातील 4, सौंदत्ती तालुक्मयातील एका बाधिताचा समावेश आहे. अथणी, चिकोडी, बैलहोंगल, गोकाक, हुक्केरी, खानापूर, रामदुर्ग, रायबाग तालुक्मयात एक रुग्ण आढळून आला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 91 वर पोहोचली आहे. तर एकूण बाधितांची संख्या 80 हजार 62 वर पोहोचली आहे. त्यापैकी 79 हजार 25 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 3 हजार 794 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे.









