मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
मनपा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. 6 सप्टेंबर रोजी बेळगाव शहर व तालुक्मयात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हा आदेश जारी केला आहे.
बेळगाव शहर व तालुका, रायबाग शहर व सौंदत्ती येथे सोमवारी सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. या काळात सभा, बैठका, मिरवणूक काढण्यावर बंदी असून पाचहून अधिक जणांनी गटाने फिरू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जमावबंदीच्या काळात नागरिकांनी घातक शस्त्र, स्फोटके घेऊन फिरू नये. प्रतिकात्मक अंत्ययात्रा, प्रतिकृती दहन करण्यावरही बंदी असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे, वाद्ये वाजविणे, मिरवणूक काढणे, गाणी म्हणणे, प्रक्षोभक वक्तव्य करणे, आरडाओरड करणे याबरोबरच नैतिकतेला धक्का पोहोचेल, अशी कोणतीही कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
विवाह, धार्मिक कार्यक्रम, अंत्ययात्रांना हा आदेश लागू नसला तरी निवडणूक आचारसंहिता व कायदा-सुव्यवस्था परिस्थितीला धक्का पोहोचू नये, यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.









